Sun, Jul 21, 2019 10:22होमपेज › Solapur › सहकारमंत्री देशमुखांसमोर पालकमंत्री, काँग्रेस व सर्वपक्षीय पॅनेलने उभे केले आव्हान

बाजार समिती निवडणुकीत तिरंगी लढत

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:14PMसोलापूर ः संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तीन प्रमुख पॅनलमध्ये लढत होत असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. सिध्दाराम म्हेत्रे, माजी आ. दिलीपराव माने आदींनी एकत्रित येत पॅनल स्थापन केले आहे. डॉ. बसवराज बगले व विजयकुमार हत्तुरे आदी नेत्यांनीही एकत्रित येत या निवडणुकीसाठी तिसरे सर्वपक्षीय पॅनेल निर्माण करून सहकारमंत्री देशमुख यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. 

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होण्याची शक्यता व्यक्‍त होत होती. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीत भाजपची सत्ता यावी यासाठीच त्यांचा गत दीड वर्षांपासून प्रयत्न दिसून येतो. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोबत घेत या निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र अंतर्गत वादामुळे पालकमंत्री देशमुख विरुध्द सहकार मंत्री अशी थेट लढत होत आहे. पालकमंत्री काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली असणार्‍या पॅनेलमध्ये उमेदवार असल्याने ही निवडणूक भाजपसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरली आहे.

काँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत भांडणामुळेच बाजार समितीवर गत दीड वर्षांपासून प्रशासक नेमण्याची संधी सहकारमंत्री देशमुख यांनी हेरली. सत्ता गेल्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते पुन्हा एकदा एकत्रित येत सत्ता काबीज करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, आ. सिध्दाराम म्हेत्रे आदी प्रमुख नेते अंतर्गत मतभेद बाजूला सारुन एकत्रित आले आहेत. त्यांच्या सोबतीला चक्‍क पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेण्यात आल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक सरळ ठरत आहे. 

काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमधील नाराज उमेदवारांना एकत्रित करुन डॉ. बसवराज बगले व विजयकुमार हत्तुरे यांनी स्वतंत्र तिसरे पॅनेल उभे करुन बाजार समितीत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सहकारमंत्री गट व पालकमंत्री गटाच्या दोन्ही पॅनलसमोर या पॅनलची ताकद कमी असली, तरी दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ झाला तर अशीच चर्चा यानिमित्ताने उमटत आहे.