होमपेज › Solapur › बाजार समितीच्या दहा गणांत लक्षवेधी लढती

बाजार समितीच्या दहा गणांत लक्षवेधी लढती

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:18PMसोलापूर ः महेश पांढरे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीत दहा गणांत लक्षवेधी लढती होणार आहेत. यामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह तीन माजी आमदारांना निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याबरोबर सामना करावा लागणार आहे. अनेक गणांत दुरंगी, तर काही गणात तिरंगी लढती आहेत.

कळमण गणातून राष्ट्रवादीचे नेते बळीरामकाका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र लढत असून त्यांचा सामना नुकतेच काँग्रेसमधून भाजपच्या अर्थात सहकारमंत्र्यांच्या गोटात दाखल झालेल्या कौठाळी येथील संग्राम पाटील यांच्याबरोबर आहे.  नान्नज गणातून उत्तर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार यांचे पती आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार यांचा सामना राष्ट्रवादीच्या गोटातून उमेदवारी मिळविलेल्या  प्रकाश चौरेकर  यांच्याशी आहे. सर्वात जास्त मतदार येथे आहेत. 

पाकणी गणातून काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे प्रकाश वानकर व  पाकणीच्या सरपंच गुंड यांचे पती सुनील गुंड यांच्यात लढत आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्याविरोधात हिरज गणातून पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर यांना सहकारमंत्र्यांच्या पॅनेलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.  कुंभारी गणातून जिल्ह्याचे पालकमंत्री  विजयकुमार  देशमुख  यांच्याविरोधात सहकारमंत्र्यांचा पॅनेलमधून शिरीष पाटील लढत देत आहेत.  

मुस्ती गणातून भाजपकडून सिध्दाराम हेले, तर विरोधी  आघाडीकडून श्रीशैल नरोळे रिंगणात आहेत. तर या गणातून अक्‍कलकोटचे माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने येथे तिरंगी लढत  आहे. मंद्रुप गणातून बाजार समितीच्या माजी चेअरमन इंदुमती अलगोंडा-पाटील  यांच्याविरोधात सुनंदा ख्याडे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. ख्याडे या स्थानिक असल्याने मतदार त्यांना पसंती देणार की इंदुमती अलगोंडा यांना, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

कंदलगाव गणातून बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्याविरोधात नुकतेच सहकारमंत्र्यांच्या गोटात दाखल झालेले आप्पासाहेब पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत.  भंडारकवठे गणातून माजी आ. शिवशरण बिराजदार-पाटील यांच्याविरोधात वसंत पाटील यांनी दंड थोपटले आहेत.  औराद गणातून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्याविरोधात संगप्पा केरके निवडणूक रिंगणात आहेत.