Thu, Apr 25, 2019 08:06होमपेज › Solapur › दोन्ही मंत्री एकाच पक्षाचे, पण भूमिका एकमेकांविरुद्ध

सोलापूर : सहकार, पालकमंत्र्यांमध्येच जुंपली!

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 21 2018 1:18AMसोलापूर ः प्रशांत माने

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता समीकरण आणि एकमेकांना सत्तेपासून रोखण्यावरून राज्याच्या दोन जबाबदार मंत्र्यांमध्येच जुंपल्याने बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुखांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उतरवले आहे, तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या पॅनेलचा आसरा घेतला आहे. एकाच पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. परंतु पालकमंत्र्यांना पॅनेलमध्ये घेतल्याचा लाभ होणार की नुकसान, हे काँग्रेसला निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

वर्षानुवर्षे केंद्र व राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र बहुतांश सहकार क्षेत्र व्यापलेले आहे. सहकार व पणन हे महत्त्वाचे खाते मिळाल्यानंतर सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि बाजार समित्यांवर पकड मजबूत करण्यासाठीची तयारी सुरू केली. कारण राज्यातील सत्ताधारी भाजप व सेनेकडे अपवाद वगळता कधीच सहकारात तितकासा प्रभाव नव्हता. याची सुरुवातच सहकारमंत्र्यांनी आपल्याच सोलापूर जिल्ह्यातून केली. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीच्या पारंपरिक मतदार प्रक्रियेला छेद देत त्यांनी बाजार समिती कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकर्‍याला मतदानाचा अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होट बँक धोक्यात आली. सोलापूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्‍त करून काँग्रेसची सत्ता खालसा केली. आपले काही शिलेदार बाजार समितीवर तैनात केले.

बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता अनेक वर्षांपासून असल्याने त्यांच्यात गटतट व धुसफूस होतीच. त्याचाच लाभ घेत सहकारमंत्री देशमुखांनी नाराज गटाला हाताशी धरत तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या कारभाराचे कच्चे दुवे काढून घेत गैरकारभार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकाने 39 कोटींच्या अपहाराचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करून काँग्रेसच्या दिग्गजांनाच चक्रव्यूहात अडकवले. अशारितीने सहकारमंत्र्यांनी बाजार समिती ताब्यात घेण्याची पूर्वतयारी म्हणून सर्व खिचडी पकवली.

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात उतरत ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत जात पालकमंत्री विजयकुमार देशमुखांनी काँग्रेसच्या पॅनेलचा आसरा घेत सहकारमंत्री देशमुखांनी शिजवलेली खिचडी खाण्याचा बेत आखला आहे. सहकारमंत्री देशमुखांनी शिजवलेली खिचडी खाण्याच्या पंक्‍तीत  पालकमंत्री देशमुख विरोधी गट काँग्रेसलाही बसवत असल्याने पालकमंत्र्यांचा हा घाव सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जिव्हारी लागला असण्याची शक्यता आहे.‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ या म्हणीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही मंत्री देशमुखांमधील वादाचा लाभ उठवत सध्या तरी उत्कृष्ट राजकीय खेळी खेळली आहे. परंतु सोलापूर शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम काय होणार याचा अभ्यास काँग्रेसने केला की नाही, याची शंका राजकीय जाणकार व्यक्‍त करीत आहेत. 

पालकमंत्र्यांना सोबत घेत काँग्रेसने डाव साधला !

प्रशासकाने अपहाराचे गुन्हे दाखल केल्यानंतर पुरत्या अडचणीत सापडलेल्या काँग्रेसने दोन्ही देशमुखांमधील वादाचा लाभ उठवत पालकमंत्र्यांनाच काँग्रेसच्या पॅनलमध्ये घेत चांगला डाव साधला आहे. ‘दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ’ या म्हणीचा लाभ काँग्रेसला मिळणार का, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पालकमंत्र्यांना पॅनलमध्ये घेतल्यावरुन काँग्रेसमध्ये नाराजीची कुजबूज सुरु असल्याची चर्चा आहे.

महापौरांनी अर्ज मागे घेण्यामागेही राजकारण !

सहकारमंत्री देशमुख यांनी निवडणुकीत पॅनेल उतरवून बाजार समिती भाजपच्या ताब्यात घेण्याची तयारी केली. परंतु पालकमंत्री विजयकुमार देशमुखांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत काँग्रेसच्या पॅनेलचा आसरा घेतला. पालकमंत्र्यांविरोधात  महापौरांनी  अर्ज दाखल केला होता, पण ऐनवेळी महापौरांनी अर्ज मागे घेतला. महापौर सहकारमंत्री गटाच्या असल्याने अर्ज मागे घेण्यामागे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.