Fri, Mar 22, 2019 00:11
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur ›  ‘यार्डा’त काँग्रेस, तर ‘डीसीसी’त राष्ट्रवादी जेरबंद

 ‘यार्डा’त काँग्रेस, तर ‘डीसीसी’त राष्ट्रवादी जेरबंद

Published On: Jun 01 2018 10:23PM | Last Updated: Jun 01 2018 10:23PMसोलापूर : प्रशांत माने 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्‍तीनंतर काँग्रेसच्या तब्बल 32 दिग्गजांवर पोलिसांत गुन्हे दाखल करून बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसला जेरबंद करण्याची यशस्वी खेळी केल्यानंतर  सहकार खात्याने राजकीय अड्डा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नियुक्‍त करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गजांना जेरबंद करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सहकार खात्याने दोन्ही काँग्रेसला कायद्याच्या खिंडीत अडकवून मोठा राजकीय धमाका केला आहे.
विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांसह भेटणार्‍या प्रत्येकाला मार्गदर्शन करा, अशी विनवणी करणारे सोलापूरचे सुपुत्र आणि राज्याच्या कळीच्या अशा सहकार खात्याचे मंत्री असलेल्या सुभाष देशमुखांनी ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरच आपले राजकीय पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे.

सुभाषबापूंकडे सहकार खाते आल्यानंतर त्यांनी प्रारंभी सोलापूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्‍तीचा घाट घातला. त्यानंतर बाजार समिती निवडणुकीसाठी मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांना शह देण्याचा यशस्वी डाव खेळला. विशेष म्हणजे बाजार समितीमधील अनियमितता, गैरप्रकारांची जंत्री सुभाषबापूंना सांगणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीतून निर्माण झालेले असंतुष्टच होते. बाजार समितीमधील गुपिते समजल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे पुरावे गोळा करुन काँग्रेसच्या तत्कालीन संचालक मंडळातील दिग्गजांना पोलिसी गुन्ह्यात अडकवण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन ते चारच दिवसांत बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा की निवडणुकीच्या मैदानात उतरायचे, अशा द्विधा भूमिकेत काँग्रेसजन अडकले असण्याची शक्यता आहे.  कोर्टकचेरी बघायची की निवडणुकीचा खेळ करायचा, असा गुंता वाढलेला असणार आहे. प्रत्यक्षात निवडणुकीचा प्रचार सुरु होईल तेव्हा मतदारांसमोर झालेल्या आरोपांचा लेखाजोखादेखील मांडावा लागणार आहे. एकूणच काय तर बाजार समिती निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या दिग्गजांना जेरबंद करुन सुभाषबापूंनी आपला सोलापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघही सुरक्षित करण्याचा डाव साधला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असतानाही पक्षातंर्गत गटबाजीमुळे मेटाकुटीस आलेल्या राष्ट्रवादीच्या थेट जिव्हारी घाव घालण्याचा प्रकार भाजपच्या सुभाष देशमुखांनी केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. परंतु गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत गटबाजी उफाळलेली आहे. सलग दहा वर्षे गटबाजी सुरू असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याही अवाक्याबाहेर ही गटबाजी गेल्याचे स्पष्ट होते आहे. याच गटबाजीचा लाभ उठवत राष्ट्रवादीच्या दुसर्‍या फळीला हाताशी धरत भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषद काढून घेतली. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चुकीच्या पद्धतीने झालेले कर्जवाटप आणि आठशे कोटींच्यावर असलेली थकबाकी यामुळे बँक अडचणीत आलेली होती.

दरम्यान, बँकेच्या गैरव्यवहारासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल होत्या. या सर्व वातावरणाचा लाभ उठवत सहकार खात्याने जिल्हा मध्यवती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन बँकेच्या शताब्दी महोत्सवी वर्षातच बँकेवर प्रशासक नियुक्‍त करुन राष्ट्रवादीच्या दिग्गजांना धक्‍का दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज बँकेच्या प्रकरणात अडकले तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला रानमोकळे होईल, असे आडाखे बांधण्यात येत आहेत. मानगुटीवर टांगती तलवार असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज भाजपच्या गळालाही लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही काँग्रेसलाच भविष्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपची ताकद वाढणार आहे.