Thu, Apr 25, 2019 21:50होमपेज › Solapur › निवडणूक बाजार समितीची, रंगीत तालीम विधानसभेची 

निवडणूक बाजार समितीची, रंगीत तालीम विधानसभेची 

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:54PMकरमाळा : प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुरूक्षेत्रावर तिरंगी सामना रंगला असून तीनही पॅनलच्या प्रमुखांनी आपल्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे.

 करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी व्यापारी-2 तर, हमाल व तोलार-1 या तीन जागा बिनविरोध निघल्यानंतर शेतकरी मतदारसंघातून 15 जागेसाठी 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी माजी आ. जयवंतराव जगताप यांच्यासोबत आ. नारायण पाटील यांची युती झाल्यामुळे या युतीचा पॅनल ग्रामीण भागामध्ये प्रचाराने खेड्यातील वातावरण ढवळून काढताना दिसत आहे. माजी आ. जगताप व आ. नारायण पाटील यांनी करमाळा येथील श्रीकमलाभवानी मंदिरामध्ये जाऊन प्रचाराचा नारळ फोडला असून या गटाच्या विरोधी असलेल्या माजी आ. शामल बागल यांच्या पॅनलने मौजे मांगी येथे जाऊन स्व. दिगंबरराव बागल यांच्या स्मृतीस्थळासमोर प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केलेली आहे. तर जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ पोथरे येथील शनी मंदिर येथे जाऊन शनीला नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केलेली आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार असताना सकाळी 7 ते 5 यावेळेमध्ये मतदान घेतले जाणार आहे. तर 11 सप्टेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये बाजार समितीची सत्ता कोणत्या गटाकडे जाणार याकरीता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पैजा लावताना कार्यकर्ते दिसत आहेत.

शेतकरी मतदारसंघातील 15 गणांपैकी जातेगाव, वांगी या दोन गणांमध्ये दुरंगी लढत असून सावडी गणामध्ये चौरंगी लढत आहे. तर इतर 12 गणांमध्ये तिरंगी लढत रंगलेली आहे. यामध्ये विशेषत: सत्ताधारी गटाचे नेते जयवंतराव जगताप यांनी वांगी व केम या दोन गणामध्ये आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे. तर बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी पोथरे गणातून आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे. या निवडणुकीमध्ये पोथरे गणामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 

या गणामध्ये माजी आ. जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप हे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात बागल गटाचे युवानेते दिग्विजय बागल हे निवडणूक लढवत आहेत. तर शिंदे गटाकडून पै. सुनील (बापू) सावंत हे निवडणूक लढवत असल्यामुळे या गणाकडे तालुकावासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे. तर जातेगाव गणातून शिंदे गटाकडून सुजित बागल हे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात बागल गटाने जि.प. सदस्य संतोष वारे यांना उमेदवारी दिल्यामुळे या लढतीकडे पण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राजुरी गणातून माजी जि.प. उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात जगताप गटाकडून बापुराव पाटील, तर शिंदे गटाकडून हनुमंत पाटील हे निवडणूक लढवत असल्यामुळे या गणाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या कुरूक्षेत्रावर पहिल्यांदाच शिंदे गटासोबत भाजपाची युती झालेली असून या युतीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर लवकरच विधानसभेची निवडणूक लागणार असल्यामुळे तीनही गटाच्या नेतेमंडळींची विधानसभेची रंगीत तालीम सध्या सुरू आहे.

निवडणुकीच्या रिंगणामध्ये माजी आ. जयवंतराव जगताप व आ. नारायण पाटील युतीकडून पॅनल उभा करण्यात आलेला असून या पॅनलमधून जयवंतराव जगताप यांनी केम व वांगी या दोन गणातून आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे. तर पोथरे गणातून त्यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांना उमेदवारी देऊन पहिल्यांदाच राजकारणात आणण्यासाठी त्यांना उभे केले आहे. त्यांनी जातेगाव गणातून आपला उमेदवार उभा केलेला नाही. तर माजी आ. शामलताई बागल गटाकडून बाजार समितीला स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे. एकूण 15 जागेसाठी 15 उमेदवार उभा करून सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

पहिल्यांदाच मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल हे पोथरे गणातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पोथरे गणाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.

तिसरा पॅनल जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात आलेला असून या पॅनलमधून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा केलेले आहेत. तर सावडी गणातून प्रहार संघटनेकडून उमेदवार म्हणून बाळासाहेब अंबादास शेळके यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात एकूण 44 जणांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेऊन नशीब आजमावत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील 118 गावांमध्ये तीनही गटाच्या नेतेमंडळींकडून कार्यकर्त्यांचा फौजफाटा सोबत घेऊन प्रचार सुरू केल्यामुळे प्रचाराचा धुराळा जोरदार उडताना दिसत आहे.