Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Solapur › आठ तूर खरेदी केंद्रांना मान्यता

आठ तूर खरेदी केंद्रांना मान्यता

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:57PMसोलापूर : प्रतिनिधी

‘राज्यभरात 159 ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू, सोलापूरला मात्र ठेंगा’ या मथळ्याखाली शनिवारी दै. ‘पुढारी’त वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तातडीने शनिवारपासूनच अक्‍कलकोट, दुधनी व कुर्डुवाडी येथे तूर खरेदी केंद्रे सरू करण्यात आली. याशिवाय अन्य पाच ठिकाणी आठ दिवसांत खरेदी केंद्रे सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पत्रकारांना दिली. 
सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे असतानाही, त्यांच्या जिल्ह्यातच तूर खरेदी केंद्रे पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले नव्हते. राज्यभरातील अन्य भागांत मात्र खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत शेतकर्‍यांतून तर्कवितर्क वर्तविण्यात येत होता. 

दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून तातडीने दखल घेत तूर खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची गत महिनाभरापासूनची प्रतीक्षा आता संपण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या शेतकर्‍यांनी सर्वात प्रथम नोंदणी केली, अशा शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाईलवरून संदेश पाठवून ठराविक दिवस माल आणण्यासाठी ठरवून देण्यात येत आहे. 
राज्य शासनाकडून सुरू करण्यात येणार्‍या तूर खरेदी केंद्रांवर तूर घालण्यासाठी एकूण 7 हजार 743 शेेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मागील वर्षी सात खरेदी केंद्रांवर 30 हजार 522 क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, करमाळा व यंदापासून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात माळकवठे या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे.   तुरीचे उत्पादन होऊन सुमारे महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. शेतकर्‍यांना प्रचंड उत्पादन खर्च करून तूर उत्पादन करावी लागली आहे. काही शेतकर्‍यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेत आपली तूर बाजार समितीच्या गोदामात कर्ज घेत ठेवली आहे. सध्या तुरीचा बाजारभाव चार हजारांच्या पुढे सरकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत हमीभावाने तातडीने तुरीची खरेदी झाली तर शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार आहे. जर तूर खरेदी केंद्रे सोलापुरात सुरू झाली नसती, तर शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला आणि अडचणींना तोंड द्यावे लागले 
असते.