Thu, Jul 18, 2019 10:43होमपेज › Solapur › नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे डस्टबिन वाटप मंद गतीने!

नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे डस्टबिन वाटप मंद गतीने!

Published On: Aug 08 2018 10:31PM | Last Updated: Aug 08 2018 10:27PM सोलापूर : दीपक होमकर

स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापूर स्वच्छ राहावे आणि सोलापूरकरांना कचरा विघटन करून तो घंटागाड्यांत देण्याची सवय लागावी, यासाठी सर्व कुटुंबांना मोफत डस्टबिन देण्यात येत आहेत. डस्टबिन वाटपाची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असताना मात्र नगरसेवकांकडून हस्तक्षेप केला जात असल्याने या डस्टबिन वाटपाची गती मंदावली असल्याच्या तक्रारी काही अधिकार्‍यांनी केल्या आहेत. 

स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापूरला आतापर्यंत चार टप्प्यांत चार लॉटमध्ये 48 हजार डस्टबिन (पेअर) आल्या आहेत. मिटकॉन या संस्थेकडे वाटपाची जबाबदारी देण्यात आली असून मिळकत कराची पावती पाहून नागरिकांना त्यांनी वाटून त्याचा अहवाल आयुक्‍तांकडे सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, वाटप करण्याआधीच विविध नगरसेवकांकडून आमच्याच 
वॉर्डात आज वाटले पाहिजे, असा आग्रह धरला जात आहेत शिवाय तेथे वाटपासाठी अधिकारी पोचतात; मात्र तेथे समारंभपूर्वक वाटपाची तयारी सुरू असते. त्यानंतर नगरसेवक प्रमुख पाहुणे म्हणून विलंबाने येतात शिवाय आल्यानंतर भाषणबाजी आणि हार-तुर्‍यांनी सत्कार करण्यात सुमारे दोन तास जातात. त्यानंतरही नगरसेवकांनी जमा केलेल्या बहुतांश लोकांकडे टॅक्स भरल्याची पावती नसल्यामुळे  त्यांना डस्टबीन देताना अनेक अडचणी येतात.  त्यामुळे वाटपाची प्रक्रिया आणखी संथ होते. वास्तविक स्मार्ट सिटीचा हा उपक्रम असल्यामुळे एकाच ठिकाणी एकत्रित उद्घाटन केल्यास नंतर दररोज दोनशे-तीनशे वाटप होऊ शकले असते; मात्र नगरसेवकांच्या समारंभपूर्वक कार्यक्रमात मात्र केवळ 35-40 डस्टबीन वाटप होतात.

ठराविक प्रभागातील ठराविक नगरसेवकांकडून वारंवार बोलाविले जात असल्यामुळे  वाटपाच्या संख्येत दरी निर्माण होत आहे. पावती नसलेल्या नागरिकांनाही डस्टबीन देण्याचा आग्रह होत असल्यामुळे अनेकांना पावतीशिवाय भाडेकरुचा कोड नंबर देऊन आणि आधारक्रमांक घेऊन त्यांना डस्टबीन वापट करण्यात येत आहे.

पंधरा दिवसांत टॅक्स भरणार्‍यांना अद्याप नाही!
टॅक्सची पावती मिळाल्यापासून ज्यांनी पंधरा दिवसांत टॅक्स भरला आहे त्या बहुतांश नागरिकांना अद्याप डस्टबीन मिळाले नाहीत. मात्र नगरसेवकांच्या दबावामुळे भाडेकरु या नावाखाली अनेक नागरिकांना  डस्टबीन मिळाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात टॅक्स भरलेल्या घरमालकांना प्राधान्याने देण्याचा अलिखित नियम करण्यात येणार आहे.


आतापर्यंत वाटप झालेले डस्टबीन
प्रभाग ः वाटप डस्टबीनची संख्या
1 ः     2020
2ः     5104
3 ः     2467
4 ः     4788
5ः     4751
6 ः     3079
7 ः     2475
8 ः     2097

नगरसेविकेच्या पतीचा हट्ट
नगरसेविका करगुळे यांचे पती बाबा करगुळे यांच्याकडून त्यांच्या प्रभागात डस्टबिन वाटपासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणि ज्यांच्याकडे टॅक्स भरल्याची पावती नाही अशांनाही आधारकार्डचा नंबर नोंद करून डस्टबिन देण्यासाठीचा हट्ट धरला गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अखेर संबंधित अधिकार्‍यांनी थेट आयुक्‍त डॉ. ढाकणे यांना फोन केला. त्यावेळी करगुळे हे शांत झाल्याचे सांगण्यात आले.