Fri, Apr 26, 2019 16:17होमपेज › Solapur › स्मार्ट सिटीतील सोलापूरकर धुळीचे बळी

स्मार्ट सिटीतील सोलापूरकर धुळीचे बळी

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 9:09PMसोलापूर : दीपक होमकर

स्मार्ट सिटी आणि विकासकामांच्या निमित्ताने सध्या सोलापुरात बहुतांश रस्त्यावर खोदकाम सुरु आहे. जेथे खोदकाम सुरु नाही, तेथे आधीपासूनच रस्ते प्रचंड खराब असल्याने डांबरी रस्ता कमी आणि खडक-माती जास्त. त्यामुळे एकंदरच अवघे सोलापूर धुळीत बुडून गेले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी होण्याआधी बहुतांश सोलापूरकर धुळीचे बळी पडत असल्याचे चित्र आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर महाराजांची यात्रा जानेवारीत भरली की होम मैदान आणि सिध्देश्‍वर पेठेतून उडणारी धूळ सोलापुरातील गावठाण भागावर अशी काही पसरली जाते की, घराघरात, दुकानात कोणत्याही वस्तूंवर पेनाशिवाय केवळ बोटाने धूळ पुसत नाव लिहिता येते. मात्र आता गड्डा संपून आठ महिने झाले तरी सोलापुरातील धूळ वाढतच आहे.

गेल्या आठ-दहा महिन्यांपासून स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापुरातील रंगभवन ते डफरीन चौक आणि डफरीन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकापर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. पाच-सात फूट खोलपर्यंत खोदलेल्या या रस्त्याची धूळ पूर्वेकडे शासकीय रुग्णालयापर्यंत तर उत्तरकडे चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत पसरली आहे. शिवाय रंगभवन चौकातील आयलँडच्या सुशोभिकरणासाठी रंगभवन सभागृहाच्या समोर रस्ता खोदून ठेवला तो केवळ मातीच्या ढिगार्‍याने बुजविल्यामुळे दुचाकी गेली तरी येथे किलोने दुराळा उडतो आहे. 

त्यामुळे दिवसभर येथील  विक्रेत्यांना धुळीने जणू अभिषेक होतो आहे. त्यातून अनेकांना घश्यांचे, डोळ्यांचे आणि त्वचेच्या व्याधी जडल्या आहेत. तर अनेकांचे डोक्यावरील केस राट व विरळ होत चालले आहेत. औद्योगिक बँक ते सोमवार पेठ पर्यंतच्या रस्त्यावर इतके प्रचंड खड्डे पडले आहेत की येथे वार्‍याची झुळक आली, तर शंभर दीडशे ग्रॅम धूळ व्यापार्‍यांच्या दुकानात शिरते आहे. अगदी अशीच अवस्था दयानंद कॉलेजपासून ते शांती चौक, अशोक चौक, तुकाराम चौक मार्गे गुरुनानक चौक रस्त्याची झाली आहे. आधीच प्रचंड धूळ त्यात अवजड वाहतूक अन प्रत्येक चौकात सिग्नलमुळे तीन-चार मिनिटे अवजड वाहतुकीच्या सायलेंसर जवळ धूर खात थांबायची वेळ यामुळे हा महामार्ग आरोग्याच्या बाबतही अधिक धोकादायक बनला आहे. सोलापुरातील मॉडेल रोड म्हणून बनविलेला संगमेश्‍वर ते जुना एम्प्लॉयमेंट चौक रस्ता हा रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावल्यामुळे येथे धुळीचे प्रमाण कमी होते. मात्र आता संगमेश्‍वर कॉलेजच्या मैदानातून येणार्‍या ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी हा रस्ताही मुस्लिम कब्रस्तान परिसरात खोदला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हा रस्ता बंद असून येथेही आता रस्ता खड्डे बुुजविण्यासाठी दर्जेदार डांबर-खडी न वापरल्यास धुळीचे लोळ उठणार आहेत.

धुळीबाबत सोलापूर होते टॉप टेनमध्ये
सुमारे वीस वर्षांपूर्वी सिध्देश्‍वर मंदिराच्या तळ्यातील गाळ काढण्याचे काम सोलापुरात पहिल्यांदा सुरु झाले होते. तो गाळ ट्रकमधून सोलापुरातील होम मैदान, कर्णिक नगरचे मैदान, अक्कलकोट रस्ता, जुनी मिल कंपाऊंड, पुणे महामार्गालगतच्या मोकळ्या जागा अशा ठिकाणी नेऊन टाकला जात होता. त्यामुळे सोलापुरात सर्वत्र धूळ झाली होती. त्यानंतर झालेल्या एका सर्वेक्षणात भारतातील सर्वाधिक धुळीच्या शहरामध्ये सोलापूर टॉप टेनमध्ये होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही स्थानिक प्रशासनाला धुळीच्या कारणावरून फटकारले होते. आज देशातील दहा स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरचा समावेश झाला तरी अद्याप धुळीच्या त्रासातून सोलापूरकरांची मुक्तता झालेली नाही.