होमपेज › Solapur › पावसामुळे दोन महिन्यांत ७ व्यक्तींसह १९ जनावरांचा मृत्यू 

पावसामुळे दोन महिन्यांत ७ व्यक्तींसह १९ जनावरांचा मृत्यू 

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 9:58PMसोलापूर ः महेश पांढरे 

गेल्या महिन्याभरात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांसह साडेसहाशे घरांची पडझड झाली असून वीज पडून 7 जणांचा मृत्यू, तर 19 जनावरे दगावली आहेत.

एप्रिल 2018 ते 6 मे 2018 पर्यंतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा, बार्शी, माढा, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण आणि उत्तर सोलापुरात वादळी वार्‍याने मोठे नुकसान झाले आहे.  अक्कलकोट तालुक्यातील एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू, तर दोनजण जखमी झाले आहेत. एकूण 9 जनावरांचा मृत्यू झाला आहे.  करमाळा तालुक्यातील एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून काही जनावरेही दगावली आहेत. बार्शी तालुक्यात एकाचा मृत्यू, तर एक महिला वीज पडून जखमी झाली असून  काही जनावरे दगावली आहेत.  अनेक तालुक्यांतील तहसीलदारांनी योग्य अहवाल दिला असला तरी काही तालुक्यांतील अचूक माहिती मिळालेली नाही.  

6 मेनंतरही आजतागायत जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वारे झालेले आहे. मात्र त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. या वादळी वार्‍यामध्ये अनेक गावांतील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक फळबागांसह  मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक गावांतील विजेच खांब पडले आहेत. 

 सविस्तर अहवाल प्रशासनाला अद्याप आलेला दिसून येत नाही. तर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे याविषयी विचारणा केली असता माहिती घेण्याचे काम सुरुच असल्याची, उत्तरे दिली जातात. प्रत्यक्षात मात्र महिना लोटला तरी प्रशासनाला  माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ज्या तालुक्यातील तहसीलदार अहवाल वेळेवर देत नाहीत त्यांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.