Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Solapur › सरकारच्या निष्क्रियतेमुळेच शेतकरी उद्ध्वस्त : चव्हाण    

सरकारच्या निष्क्रियतेमुळेच शेतकरी उद्ध्वस्त : चव्हाण    

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:15PMसोलापूर : प्रतिनिधी  

भाजप सरकारच्या शेतकर्‍यांविषयी असलेल्या उदासीन धोरणामुळे  शेतकर्‍यांच्या शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची दयनिय अवस्था झाली असून सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळेच शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.आ. पृथ्वीराज चव्हाण हे शनिवारी एका कार्यक्रमासाठी सोलापूरला आले होते. यावेळी त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीतच राज्यातील शेतकरी हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. दुधाचा व्यवसायही सरकार मोडीत काढू पाहतयं.कधी नव्हती इतकी बिकट अवस्था राज्यातील बळीराजाची झाली असून शेतकर्‍यांच्या आत्महत्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. जगाच्या पोशिंद्याची  अशी अवस्था करणार्‍या सरकारला जनता कधीच माफ करणार नसल्याचे  ते यावेळी म्हणाले.

राज्यात सध्या भाजपाकडे एकहाती सत्ता आहे. तरीदेखील राज्यात विकासकामे करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री नुसत्याच घोषणा करीत सुटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: कितीही पारदर्शी असल्याचा कांगावा करीत असले तरी त्यांच्या पारदर्शीपणाचा चेहरा महाराष्ट्राने ओळखला आहे.त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांची चौकशी न करताच त्यांना क्लिन चिट दिली जात आहे. या सर्व भ्रष्ट मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी झाली तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी टीका यावेळी चव्हाण यांनी केली.

यावेळी खा. कुमार केतकर, आ. गणपतराव देशमुख, आ. सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, विश्‍वनाथ चाकोते, निर्मलाताई ठोकळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कल्याणराव काळे, नगरसेवक बाबा मिस्त्री, शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, गटनेते चेतन नरूटे, प्रवीण देशपांडे, महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी महापौर अलका राठोड, जयश्री माने, पृथ्वीराज माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags : Solapur, Due, inefficiency,  government, farmers, ruined