Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Solapur › उत्तर सोलापूरवर दुष्काळाचे सावट!

उत्तर सोलापूरवर दुष्काळाचे सावट!

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 1:03AMसोलापूर : प्रतिनिधी 

संपूर्ण सोलापूर जिल्हाच सध्या दुष्काळाच्या छायेत असला तरी काही तालुक्यांत बर्‍यापैकी पाऊस पडलेला आहे. मात्र, उत्तर सोलापूर तालुक्यातील अवस्था खूपच हलाखीची असून त्या ठिकाणचा विचार करून गतवर्षीपेक्षा यावर्षी खूपच कमी पाऊस पडल्याने हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवालही तयार केला असून, तो लवकरच राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांच्या वतीने देण्यात आली.

उत्तर सोलापूर तालुक्यात यंदा म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतीसह जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न ऐरणीवर आहे. तालुक्यात सुरुवातीला एक-दोन पाऊस पडले असले, तरी त्यानंतर मात्र दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील विहिरीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे निम्मा पावसाळा संपत आला तरी तालुक्यातील अनेक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यंदाचा खरीप जवळपास निम्मा वाया गेला असून काही भागांतील खरीप पिके तग धरून आहेत. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला तरच तालुक्यातील पाण्याची पातळी वाढणार आहे अन्यथा उत्तर सोलापूर तालुक्याला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. 

आजपर्यंतच्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरीपेक्षा निम्माही पाऊस तालुक्यात पडला नाही. त्यामुळे पैसेवारी कमी आली असून या पार्श्‍वभूमीवर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. लवकरच हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे, असेही प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे.