Tue, Jan 22, 2019 11:41होमपेज › Solapur › लोकसहभागातील जलयुक्तच्या कामांनी दुष्काळमुक्ती

लोकसहभागातील जलयुक्तच्या कामांनी दुष्काळमुक्ती

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:58PMसोलापूर : संतोष आचलारे 

राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेने आतापर्यंत तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी लोकसहभागातून जमवून यातून जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण केली आहेत. या कामांसाठी सोलापूर जिल्ह्यावरील दुष्काळाचा डाग हटत असून हा उपक्रम संपूर्ण राज्यभरासाठी आदर्शवत ठरत आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व जि.प. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तु.सु. देवकर यांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे. 

जलयुक्त शिवार विशेष अभियानातून पाझर तलाव दुरुस्ती, गाव तलाव दुरुस्ती, तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारे आदी प्रकारच्या 391 कामांवर 21 कोटी रुपयांचा निधी खर्च करुन कामे पूर्ण करुन घेण्यात आली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून 21 कामांसाठी मिळालेल्या कामांवर 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी खर्च करुन वरीलप्रमाणेच कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद सेसफंडातील 58 लाख रुपयांच्या निधीतून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती व गाव तलाव दुरुस्तीची 14 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 437 नाला सरळीकरणाची कामे पूर्ण करुन यावर 3 कोटी 37 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार जि.प.ने लोकसहभागातून गत दोन वर्षांत अनेक कामे सुरु केली. या मोहिमेत तब्बल 25 कोटी रुपयांच्या मूल्यांची कामे पूर्ण करुन गावोगावी व प्रत्येकाच्या रानारानांत शाश्‍वत पाणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरणाची 303 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यंदा चांगला पाऊस झाला तर या कामांचे फलित शिवारात थांबलेल्या पाण्यातून दिसणार आहे. यामुळे दुष्काळमुक्तीचा मार्ग मोकळा होत आहे.