होमपेज › Solapur › अवकाळी पावसाचा तडाखा

अवकाळी पावसाचा तडाखा

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:56PMसांगोला/पंढरपूर : प्रतिनिधी 

शहर व तालुक्यात रविवारी रात्री 10 नंतर वादळी वारे व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे बुरंगेवाडी येथील घरावरील कुंबी व पत्रे उडाल्याने मुलगा जागीच ठार, तर मुलगी जखमी झाली असून कारंडेवाडी येथे पत्र्याच्या शेडखाली सापडून जर्सी गाय मरण पावली आहे.  अवकाळी पावसाचे पाणी शहरातील महात्मा फुले चौकातील सिद्धनाथ कलेक्शन या कापड दुकानात शिरल्याने दुकानातील महागडे सूटिंग, शर्टिंग, शालू, साड्या, रेडीमेड कपडे व फर्निचर साहित्य भिजल्याने सुमारे 10 लाख रु.चे नुकसान झाले आहे. तर या वादळी वारे व पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या पावसाने पंढरपूर तालुक्यालाही झोडपले.

    सांगोला शहर व तालुक्यात रविवारी रात्री 10 च्या सुमारास अचानक आलेले वादळी वारे व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या वादळी वारे व पावसामुळे बुरंगेवाडी (परीट वस्ती) येथे पत्र्यावरील कुंबी व लोखंडी अँगल, दगड, अंगावर पडून केराप्पा रामचंद्र बुरंगे (वय 7) हा मुलगा जागीच ठार झाला. लक्ष्मी रामचंद्र बुरंगे ही मुलगी जखमी झाली आहे. तर महिम(कारंडेवस्ती)येथे पत्र्याच्या शेडखाली सापडल्याने सुखदेव मारुती कारंडे यांची जर्शी गाय मरण पावली. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी घरावरील पत्रे, जनावरांचे निवारा शेड, लग्न मंडप उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

   सुमारे दोन-अडीच तास झालेल्या अवकाळी पावसामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंड हवेचा दिलासा मिळाला. रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच राहिली. वादळी वार्‍यात नेहमीप्रमाणे वीज गुल झाल्याने नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. सोमवार 7 रोजी सकाळी 10 वा.पर्यंत ढगाळ वातावरणात अधुनमधून तुरळक पाऊस पडत होता. रविवारी रात्री तालुक्यात नऊ मंडलनिहाय 90.5 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वादळी वारे व मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामाच्या ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळाले.    सोमवारी दिवसभर गांव कामगार तलाठी गावोगावी भेट देऊन नुकसानीची माहिती व पंचनामा करण्यात व्यस्त होते.

पंढरपूर तालुक्यालाही झोडपले

 रविवारी रात्री झालेल्या मान्सूनपूर्व वादळी वारा व अवकाळी पावसाने शहर व तालुक्याला झोडपून काढल्याने द्राक्षे, बेदाणा, आंबा यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कांदा पिकालाही याचा फटका बसला आहे. लक्ष्मी टाकळी, गादेगाव परिसरात वीज कोसळली आहे. मात्र कोणतीही जीवीतहानी झाली नाही. महिन्याभापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांत शहर व तालुक्यात तापमान 42 अंशाच्या जवळ पोहचले आहे. रविवारी दिवसभर उकाडा जाणवला. रविवारी दिवसभर तापमानात प्रचंड वाढ झाली होती तर  रात्री 9 वाजल्यानंतर तालूक्याच्या दक्षिण भागाकडून वीजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला रिमझिम सुरू असलेल्या पावसाने रात्री 11.30 ते 12 या दरम्यान जोरदार हजेरी लावल्याने  कासेगाव,  अनवली, ल.टाकळी, चळे, आंबे, रांझणी, भागात पाणी साचले होते. पहाटेपर्यंत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सुर्यदर्शन झाले नाही. त्यामूळे ऐन उन्हाळ्यात एकप्रकारचा सुखदा अनुभव नागरिकांना मिळाला.

वीजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षे, बेदाना उत्पादकांची झोप उडवली. तर  काढणीकरुन वाळत टाकलेला अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजून मोठे नुकसान झाले आहे. आंब्यांच्या कैर्‍या, उतरणीला आलेले आंबे पडून नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला नसला तरी  द्राक्षे उत्पादक भागात म्हणजेच चळे व कासेगाव मंडलात जोरदार पाऊस पडला आहे. चळे मंडल येथे 21 मिमी तर कासेगाव मंडल येथे 23 मिमी पावसाची नोंद  झाली आहे. 

तर लक्ष्मी टाकळी येथील तेल्याचा म्हसोबा परिसरात एका घरावर वीज कोसळली तसेच गादेगाव येथही वीज कोसळली मात्र कोणतीही जीवित्त हानी झाली नसल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान रविवारी झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील तापमानात घट झाली असून सोमवारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.