Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Solapur › दुष्काळ निधी वितरण; प्रशासनाची दमछाक

दुष्काळ निधी वितरण; प्रशासनाची दमछाक

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:15PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी   

सन 2015-16 साली झालेल्या दुष्काळात शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने दुष्काळ निधी मंजूर केला होता.त्यापैकी 57 कोटी रुपये प्रशासनाकडे येऊन पडले आहेत. त्यापैकी केवळ 30 टक्के रकम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली आहे, तर उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची केविलवाणी धडपड सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याची दुष्काळ निधीची मागणी जवळपास 100 कोटी रुपयांच्या पुढे होती. मात्र शासनाने त्यापैकी काही रक्कम पाठविली आहे.  उर्वरित रक्कम कर्जमाफी झाल्यामुळे मिळेल अथवा नाही, अशी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आलेली रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करा, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यासाठी पात्र शेतकर्‍यांनी बँक खाते नंबर देणे महत्त्वाचे आहे. मात्र येणारी रक्कम ही खूपच कमी आहे. यामध्ये एकर हजार ते पाचशेच्या पटीत ही रक्कम असल्याने हजार-पाचशे मिळविण्यासाठी शेतकरी धजावत नाहीत. त्यामुळे बँक पासबुक तलाठ्याकडे देण्यास शेतकर्‍यांमध्ये मोठी उदासीनता दिसून येत आहे.  दुसरीकडे हा निधी तत्काळ वितरित करावा, असा तगादा जिल्हा प्रशासनाने लावला आहे. त्यामुळे तहसीलदार या प्रक्रियेत सक्रिय झाले असून त्यांनी आता तलाठ्यांच्या मागे तगादा लावला असून पात्र शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर मिळवून दुष्काळ निधीची रक्कम तात्काळ जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
त्यामुळे तलाठ्यांना आता शेतकर्‍यांच्या दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.

बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन 
तहसील प्रशासनाला शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर आवश्यक आहे. मात्र येणारी रक्कम हजार ते पाचशे रुपयांच्या पटीत असल्याने शेतकर्‍यांमध्ये ही रक्कम मिळविण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे. अनेक शेतकर्‍यांची बँक खाती जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आहेत. त्यामुळे पात्र यादी प्रमाणे जिल्हा बँकेने जर शेतकर्‍यांचे खाते नंबर उपलब्ध करून दिले तर ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.