Sat, Apr 20, 2019 08:49होमपेज › Solapur › मोहोळमध्ये डॉ. लहानेंचा धन्‍वंतरी पुरस्‍काराने गौरव

सोलापूर : दोन किडन्या घ्या, पण.. : डॉ. लहानेंकडून आठवणींना उजाळा

Published On: Jul 28 2018 4:59PM | Last Updated: Jul 28 2018 4:59PMमोहोळ : वार्ताहर

मोहोळ तालुक्यातील पहिले एम.बी.बीएस डॉ. वसंतराव गरड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मोहोळ परिसरात शिक्षण संस्था उभारली. या संस्‍थेच्या वतीने देण्यात येणार्‍या धन्‍वंतरी पुरस्‍काराने प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ तथा मुंबईच्या जे.जे. रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंना यांना गौरविण्यात आले. आज, शनिवारी कै. डॉ. वसंतराव गरड यांच्या पाचव्या पुण्यस्‍मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्‍कार प्रदान करण्यात आला. 

डॉ. गरड यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी समाज सेवेचा वसा सोडला नाही. डॉ.वसंतराव गरड यांच्या समाज कार्याचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने त्यांचे सुपुत्र प्रतापसिंह गरड व प्रवीणसिंह गरड यांनी सुरू केलेला धन्वंतरी पुरस्कार निश्चितपणे राज्यातील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दीपस्तंभ ठरत आहे. या महत्त्‍वाच्या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याने माझ्या पुढील आयुष्यातील सामाजिक कार्याची उमेद वाढवणारी ठरणार आहे. अशी भावनिक कृतज्ञता डॉ. लहाने यांनी मोहोळ येथे व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक राजेंद्र दास हे होते. राज्यसभेचे माजी खासदार तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या हस्ते डॉ. लहानेंना धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

पुरस्‍कार विजेते महान, मी लहान : डॉ. लहाने

"यापुर्वी ज्यांना हा धन्वंतरी पुरस्कार मिळाला ते महान आहेत. आणि मी लहाने आहे" त्यांच्या या शाब्दिक कोटीमुळे सभागृहात हशा पिकला. या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचे मला समजल्यानंतर मला निश्चितपणे आनंद झाला. अशी भावनिक स्पष्टोक्ती यावेळी डॉक्टर लहाने यांनी उपस्थितांपुढे दिली. 

दोन किडन्या घ्या, पण... : डॉ. लहानेंकडून आठवणींना उजाळा

यावेळी डॉ. लहाने यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. घरची परिस्थिती प्रतिकुल असल्यामुळे प्राथमिक शिक्षण कसे बसे पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई गाठल्यानंतर मुंबईमध्ये इंग्रजी भाषेचा वापर ही सर्वात महत्त्वाची समस्या होती. तेव्हापासून  इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचे मनात ठरवले. परिक्षेत कॉपी केल्यामुळे २३ मार्काने मराठवाड्यात माझा पहिला क्रमांक हुकला. तरीही मनाला खंत वाटली नाही, कारण मी कधीही कॉपी केली नाही, असे डॉ. लहानेंनी सांगितले. 

शरीरातील एक किडनी खराब झाल्यानंतर "माझ्या दोन किडन्या काढून घ्या मात्र माझा तात्या जगला पाहिजे" अशी आईने केलेली विनवणी आजही माझ्या हृदयामध्ये घर करून आहे. आज माझ्या आईचे वय ८२ असून देखील तिचा माझ्यावर आणि माझा तिच्यावर तेवढाच जीव आहे. त्यामुळे आई-वडिलांची सेवा करणे हेच तुम्हा सर्वांच्या समोरचा ध्येय आहे, असे डॉ. लहाने म्‍हणाले. 

कार्यक्रमाला मंचावर मोहोळचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन राजन पाटील, देशभक्त संभाजीराव गरड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब क्षिरसागर, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख संजय काका देशमुख, भाजपचे नेते संजय क्षीरसागर, भाजप तालुकाध्यक्ष सतीश काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, विहान हॉस्पिटलचे डॉ. सत्यजित मस्के, श्रीमती वसुंधरा वसंतराव गरड, डॉ.गरड यांच्या सुकन्या अश्लेषा कांचन, मंदाकिनी शिंदे, देशभक्त संभाजीराव गरड बहुद्देशीय व संशोधन संस्थेचे सचिव प्रतापसिंह तथा शैलेश गरड, खजिनदार प्रविणसिंह वसंतराव गरड, प्राचार्य. डि.एस.तिकटे आदी मान्यवर उपस्थित होते.