होमपेज › Solapur › डॉ. ढाकणेंचा ‘गुडेवार’ करण्याच्या हालचाली !

डॉ. ढाकणेंचा ‘गुडेवार’ करण्याच्या हालचाली !

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 9:14PMसोलापूर : विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ मिशन योजनेत देशातील पहिल्या दहा महापालिकांत सोलापूरचा समावेश केला असला तरी आर्थिक डबघाईस आलेली महापालिका पाहता हे शहर ‘स्मार्ट’ कसे होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मनपाच्या तिजोरीत ठणठणाट असून गाळेभाडेपोटी किमान 100 कोटी रुपयांचे भाडे मिळणे अपेक्षित असताना केवळ दहा कोटी रुपयांच्या वार्षिक भाड्यावर मनपाची बोळवण होत आहे. यासंदर्भात ई-टेंडर प्रक्रिया राबवून आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी हे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही हातमिळवणी करून हा प्रयत्न उधळून लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

माजी आयुक्‍त चंद्रकांत गुडेवार यांच्यानंतर ढाकणे यांनीच याप्रश्‍नी कठोर भूमिका घेतली आहे. तथापि, ढाकणे यांचाही ‘गुडेवार’ करण्यासाठी मनपातील एक राजकीय गट व शहरातील काही बडे व्यापारी प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.  तूर्त तरी मुख्यमंत्र्यांनी गाळेभाडेवाढीस स्थगिती दिल्याने व्यापारीसंकुलातील 1386 छोट्या-मोठ्या गाळ्यांचा भाडेवाढीचा प्रश्‍न लाल फितीत अडकला आहे. सोलापूर महापालिकेच्या मालकीचे शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल 19 व्यापारीसंकुल आहेत. त्यात एकूण 1386 गाळे आहेत. 

या गाळ्यांचे भाडे अतिशय नगण्य असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यात वाढच झालेली नाही. विशेष बाब म्हणजे इंदिरा गांधी पार्क स्टेडियमसह नव्या पेठेतील लालबहादूर शास्त्री व्यापारीसंकुलासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत हे गाळे आहेत. शहराची लोकसंख्या दहा कोटींच्या घरात असून मनपाचे यंदाचे आर्थिक बजेट 1356 कोटी रुपयांचे आहे. खरेतर मनपाने हे आर्थिक अंदाजपत्रक फुगवलेले आहे.   
गाळे भाडेवाढ करण्यासाठी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी  2013-14 मध्ये केलेले प्रयत्न तत्कालीन सत्ताधार्‍यांनी  हाणून पाडले होते. गाळेधारक व्यापारी व लोकप्रतिनिधी यांची अभद्र युती भाडेवाढीच्या आड येत असून त्यामुळे तब्बल 90 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरावे लागत आहे. भाडेवाढीचा प्रश्‍न  हाती घेतला की संबंधित आयुक्‍तांची उचलबांगडी करण्यासाठी विरोधक, सत्ताधारी आणि व्यापारी एकत्र येतात.  गाळे भाडेवाढवरून आयुक्‍त डॉ. ढाकणे यांनी आपली भूमिका सौम्य न केल्यास त्यांच्या बदलीसाठी मनपातील एक गट सक्रिय होणार असल्याची खात्रीशीर माहितीदेखील हाती आली आहे.  

2014 मध्ये गुडेवारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तोच निर्णय आता आयुक्‍त ढाकणे यांनी घेतला आहे. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांचा निर्णय हाणून पाडण्यासाठी सत्ताधारी व विरोधी अशा दोन्हीही पक्षांतील एक गट सक्रिय झालेला आहे. बंगला प्रकरणावरून सहकारमंत्रीदेखील ढाकणे यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गाळेभाडेवाढ होणे गरजेचे, परंतु नगरसवेकच अडथळे आणत असल्याची चर्चा आहे. 

मनपाला किमान 100 कोटी मिळतील

भाडेकरार संपलेल्या  गाळ्यांचे भाडे बाजारभावाप्रमाणे  न वसूल करता रेडीरेकनरप्रमाणे भाडेवाढ करावी, गाळेधारक व्यापार्‍यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका महापालिका सभागृहाने घेतलेली आहे. ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त भाडेवाढ मिळावी, अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. सभागृहाचा ठराव यापूर्वी कायद्याच्या कसोटीवर टिकलेला नाही. तरीही ठराविक नगरसेवक आयुक्तांविरोधात भूमिका घेत आहेत. या गाळ्यांचे ई-लिलाव झाले तर मनपाला किमान 100 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.