Thu, Jun 20, 2019 21:46होमपेज › Solapur › आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची जम्बो भरती

आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची जम्बो भरती

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:45PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’च्या पदांची जम्बो भरती करण्यात येणार आहे. याबाबत शासनाकडून अर्ज मागवण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील पदभरतीचाही यात समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ दर्जाची एकूण 723 पदे भरण्यात येणार आहेत. सोलापूरसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा गट ‘अ’ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदावर ही सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विशेष मागास प्रवर्ग - 66 पदे, ओबीसी - 8 व खुला प्रवर्गातील एकूण 649  पदांचा समावेश आहे. या पदभरतीमुळे अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांवर मनुष्यबळ प्राप्त होणार असल्याने रुग्णसेवेवरील ताण कमी होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 14 पदे रिक्त 

सोलापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी पदाची एकूण 14 पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर ताण येत आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी पदाची मोठी भरती करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील ही रिक्त पदे भरली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

इतर कर्मचार्‍यांची पदभरती कधी?

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ दर्जाची एकूण 649 पदांची भरती करण्यात येणार असली तरी जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक आदी पदांचा त्यात समावेश आहे. त्या पदांअभावी अनेक गावांतील रुग्णसेवेवर मोठा ताण येत आहे. अनेक ठिकाणी पुरेशा ताकदीने सेवा पुरविणे अशक्य आहे. त्यामुळे या विविध पदांची तातडीने भरती करण्याची गरज आहे.