Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Solapur › 'सरकारशी चर्चा नाही, मुख्यमंत्र्यांना भेटायचे नाही'

'सरकारशी चर्चा नाही, मुख्यमंत्र्यांना भेटायचे नाही'

Published On: Jul 19 2018 8:22PM | Last Updated: Jul 19 2018 8:23PMपंढरपूर : प्रतिनिधी 

मराठा - धनगर समाजाचा प्रश्‍न सोडवल्याशिवाय मुख्यमंत्र्यांशी, राज्य सरकारशी कसलीही चर्चा करायची नाही. पंढरपूर दौर्‍यावेळी कुणीही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे नाही, त्यांना भेटायचे नाही आणि समन्वय राखून आंदोलन सुरूच ठेवायचे असा निर्णय मराठा क्रांती मोर्चा, राज्य धनगर आरक्षण समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

आषाढी यात्रेच्यावेळी पंढरीत येणार्‍या मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्याचा इशारा या तिन्‍ही संघटनांनी दिला असून आंदोलन सुरू केलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दराचे आंदोलन सुरू असून या आंदोलनास मराठा क्रांती मोर्चा, धनगर आरक्षण कृती समितीने पाठींबा दिलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील जाधव जेठाभाई मठात मराठा, धनगर समाजासह स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली. 

या बैठकीत मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्य सरकारने आजवर केवळ सकारात्मकता दाखवून चर्चेत वेळ घालवला आहे. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला तरच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करू अन्यथा त्यांच्याशी कसलीही चर्चा करायची नाही, त्यांना निवेदनही द्यायचे नाही असा निर्णय यावेळी सर्वांनी घेतला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी दुध दरावर तोडगा जरी निघाला तरी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी संघटना दोन्ही समाजांसोबत आंदोलनात असेल अशी ग्वाही देण्यात आली.  येत्या २३ तारखेला शासकीय महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी गनिमी काव्याने आंदोलन करण्यासंदर्भात सर्व संघटनांनी एकत्रीत चर्चा केल्याचे समजते.