Fri, May 24, 2019 07:06होमपेज › Solapur › विद्यार्थ्यांना संशोधन जगासमोर ठेवण्याची संधी : पालकमंत्री

विद्यार्थ्यांना संशोधन जगासमोर ठेवण्याची संधी : पालकमंत्री

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:21PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

मुलांमध्ये अनेक कल्पनाशक्‍ती असते. आकाशात ज्याप्रमाणे फुले उंच उडतात, त्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात उंच उडी घ्यावी. देशाच्या जडणघडणीत योगदान देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना एक नामी संधी असल्याचे मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्‍त केले.

सोलापूर जि.प. शिक्षण विभाग, आर.एस. चंडक हायस्कूल यांच्या संयुक्‍त विद्यमाने सम्राट चौकात चंडक हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय 43 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सकाळी हवेत फुगे सोडून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील होते. याप्रसंगी सोलापूर एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह अ‍ॅड. विजय मराठे, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे आदी उपस्थित होते.

यावेळी शिवानंद पाटील म्हणाले, आजचे शालेय दशेतील वैज्ञानिक हे भावी संशोधक व शास्त्रज्ञ आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रारंभी सीईओ डॉ. भारुड म्हणाले, भारतात युवा शक्‍ती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दुर्दैवाने शिक्षणपद्धतीत काही उणिवा निर्माण होत आहेत. संशोधनवृत्तीची प्रेरणा देणारी पद्धत दिसून येत नाही. त्यामुळे शोध खूप कमी लागतात. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून व्यक्‍तिमत्व विकास करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण घेऊन जर मुले बाहेर तोडफोड करीत असतील तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. 

या प्रदर्शनात जिल्हाभरातील पाचती ते बारावीपर्यंतच्या 62 शाळेतील 122 विद्यार्थ्यी आपले प्रयोग सादर करीत आहेत. सौर ऊर्जावर आधारित प्रकल्प, हायड्रोफोनिक्स चारा उत्पादन, रस्त्यावरील वीज बचत आदी प्रकारचे प्रयोग नागरिकांना याठिकाणी प्रदर्शनासाठी आकर्षित करीत आहेत. विज्ञान प्रदर्शनाला भेट देता यावी, यासाठी महापालिका परिवहन बसची उपलब्धता करून देण्यात येत आहे.