Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Solapur › शिवसेना पंढरपूर विभागाची पंढरपुरात जिल्हास्तरीय बैठक 

शिवसेना पंढरपूर विभागाची पंढरपुरात जिल्हास्तरीय बैठक 

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 7:46PMपंढरपूर : प्रतिनिधी

शिवसैनिक जरी तळागाळातील जनतेसाठी काम करीत असला तरी त्याचे रूपांतर मतांमध्ये होताना दिसत नाही. आपण जर सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, हा विश्‍वास लोकांना द्या. तरच लोक विश्‍वास ठेवतील व भविष्यात त्यांचे मताधिक्यामध्ये रूपांतर होईल. घर तेथे कार्यकर्ता, गाव तेथे शाखा अभियान राबवत सर्वसामान्य नागरिकांचा संपर्क वाढवा, लोकांना विश्‍वास द्या, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांनी केले.

पंढरपूर विश्रामगृहावर पंढरपूर विभागात येणार्‍या पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यांची जिल्हास्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आ. सावंत यांनी प्रत्येक तालुक्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी बोलताना, येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना जवळपास स्वबळावर लढणार हे निश्‍चित आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा. आपापसातील मतभेद मिटवा व शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवा, अशा सक्त सूचनाही  आ. सावंत यांनी यावेळी  पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

या बैठकीला आ. तानाजी सावंत यांच्यासह सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, आ. नारायण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अभंगराव, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख, संतोष माने, सूर्यकांत घाडगे, प्रा. येताळा भगत, मधुकर बनसोडे, स्वप्नील वाघमारे, महेश चिवटे, संजय पाटील, दीपक गायकवाड, सीमा पाटील, रवी मुळे, सुधीर अभंगराव, काका बुरांडे, शरद चवरे, संजय घोडके, योगेश चव्हाण, विठ्ठल जाधव, इंद्रजीत गोरे, अर्जुन वाघ यांच्यासह पाचही तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दूधसंघाचा प्लँट उभारणार 
जिल्ह्यातील साखर सम्राट, सहकारी संस्था चालक शिवसैनिकांची अडवणूक करण्यासाठी साखरेचे, दुधाचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे पाच साखर कारखाने उभा केले आहेत. शेतकर्‍यांची अडवणूक न होता सरसकट उसाचे गाळप करून शेतकर्‍यांना आधार दिला जात आहे. तरीही काहीजण दूध संघ, सोसायटीचे राजकारण करीत असतील तर येत्या काही दिवसात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर शेतकर्‍यांसाठी एक दूध संघाचा प्लॅन्ट उभारणार आहे, असे आ. सावंत यावेळी म्हणाले.