Fri, Jul 19, 2019 01:09होमपेज › Solapur › जिल्ह्याचे नेते जिल्ह्याकडे बघतील का?

जिल्ह्याचे नेते जिल्ह्याकडे बघतील का?

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 9:53PMराष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नुकतेच माढा तालुक्यातील एका कार्यक्रमात हजेरी लावून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे जिल्ह्याचे नेते असल्याची गुगली टाकली गेली. त्यांच्या या गुगलीने मामांचे कौतुक होत असले तरी त्यांनी त्यांच्या कृतीतून आता खर्‍या अर्थाने जिल्ह्याचे नेते म्हणून ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मुळात ना. पवार यांनी संजय मामांना जिल्ह्याचे नेते म्हणून दिलेली पदवी ही कोणत्या पक्षातून दिली असे प्रश्‍नचिन्ह आहे. भाजपच्या सहकार्याने त्यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्णी लागल्याने साहजिकच हा विषय चर्चेचा ठरला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संजय शिंदे यांना मार्च महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत त्यांचा भाजपच्या घरात अधिकृत गृहप्रवेश न झाल्याने आगामी एक वर्षाच्या काळात त्यांच्या या घरातील गृहप्रवेश होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे ना. पवार यांच्या गौरवोद‍्गाराचे काटे घड्याळाभोवतीच फिरत असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना संजय शिंदे यांच्याकडून सातत्याने करमाळा व माढा या दोन तालुक्यासाठीच निधी सर्वात जास्त देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मागील दोन सभेत असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला होता, या आरोपास मामांनीही अप्रत्यक्षपणे कबुली देत आतापर्यंत या दोन्ही तालुक्यासाठी शिल्‍लक असलेला अनुशेष भरुन काढत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. हा विषय माळशिरस विरुध्द माढा असा रंगला असला तरी राजकीय समिकरण बाजूला सारुन उपेक्षित तालुक्यांसाठी निधी देण्याची भूमिका जि.प. अध्यक्ष म्हणून संजयमामांनी घेण्याची गरज आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट या यासारख्या तालुक्यांना गत कांही वर्षात निधी मिळाला गेला नाही, अशा वंचित तालुक्यांचाही अनुशेष भरुन काढण्याची भूमिका जिल्ह्याचे नेते या नात्याने मामांना घ्यावी लागणार आहे. विधानसभेसाठी माढा की करमाळा हा विषय जरी ऐरणीवर असला तरी निवडणुकीच्या वेळी हा विषय परिस्थितीने समोर येणारच आहे. मात्र जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना संपूर्ण जिल्ह्याचा समतोल विकास कसा करता येईल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत माळशिरसकर तसे वागले म्हणून आम्ही पण तशीच भूमिका घेऊ, असे वर्तन जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला भविष्यात शोभून दिसणारे नाही हे मात्र निश्‍चित.