Sun, Jan 20, 2019 10:14होमपेज › Solapur › जिल्हा बँकेच्या संचालकांवर आज आरोप निश्‍चिती

जिल्हा बँकेच्या संचालकांवर आज आरोप निश्‍चिती

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:36PM कुर्डुवाडी : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांची बँक अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2100 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केलेले आहे. हे कर्ज व इतर बेकायदेशीर बाबी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात बँकेच्या 18 संचालकांविरुद्ध आरोप निश्‍चिती होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते नागनाथ कदम यांनी दिली आहे.

जिल्हा बँकेच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात माजी आमदार राजेंद्र राऊत व उपळाई येथील सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. 
मागील काही दिवस मुंबई उच्च न्यायालयाने सलग सुनावणी घेतली व बुधवारी या गैरव्यवहाराविरोधात न्यायालय आरोप निश्‍चित करून निकाल देणार आहे. या दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीवरून राज्य शासनाने सोलापूर जिल्हा बँक बरखास्त केलेली होती. बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने न्यायालयात बेकायदेशीरपणे बँक बरखास्तीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावरदेखील सुनावणी घेण्यात आलेली आहे. तथापि, न्यायालयाच्या चौकशीच्या दणक्याने संचालक मंडळाने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. सरकारी वकील मोरे यांनी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी न्यायालयासमोर केलेली आहे. उच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देऊन संचालकांवर कोणती कायदेशीर कारवाई करते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे.