होमपेज › Solapur › जिल्हा बँकेचा धडाका; 639 कोटी कर्ज वसूल!

जिल्हा बँकेचा धडाका; 639 कोटी कर्ज वसूल!

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 10:05PM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्हाभरातील थकबाकीधारकांकडून 30 जूनपर्यंत 639 कोटी रुपयांपर्यंतची वसुली झाली आहे. त्यामध्ये अल्पमुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज व दीर्घ मुदतीच्या कर्जांची वसुली केली जात आहे. जिल्हा बँकेकडे कर्जवसुलीची एकूण रक्कम 1472 कोटी 39 लाख 52 हजार एवढी थकबाकी आहे. विशेष बाब म्हणजे, बँकेने गतवर्षीपेक्षा यंदा 50 कोटींनी अधिक कर्ज वाटप केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परत न करणार्‍या थकबाकीदारांकडून बँक  कर्जाची रक्कम  वसुली  करत आहे. कर्ज वसुलीसोबत कर्ज वाटपाचा धडाकादेखील सुरू केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कर्ज वाटपाच्या रकमेत 50 कोटींचा फरक झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षी जेवढी रक्कम वाटण्यात आली होती, त्याहीपेक्षा 50 कोटी अधिक कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेत परतफेड न करणार्‍या मोठ्या थकबाकीदारांसाठी नव्या कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली आहे.

गेल्या सव्वा महिन्यापासून कर्ज वाटप, कर्जमाफी व कर्ज वसुलीचे कामकाज जोमात चालू आहे. सव्वा महिन्यापूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यापासून कामकाजात सुसूत्रता आली आहे. कर्ज वसुलीमध्ये पंढरपूर व करकंब मिळून 65.28 कोटींची वसुली झाली आहे. टेंभुर्णी व कुर्डुवाडी मिळून 109 कोटी 66 लाख 77 हजार रुपये वसूल झाले आहेत. मोहोळ व अनगर मिळून 19 कोटी 93 लाख रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. अकलूज व माळशिरस मिळून 81 कोटी 73 लाख  रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. अक्क्लकोट व तडवळ मिळून 50 कोटी वसूल झाले आहेत. सांगोला व जवळा मिळून 51 कोटी 84 लाख रुपयांची वसुली झाली आहे. करमाळा व जेऊर मिळून 65 कोटी 70 लाख 98 हजार रुपये वसूल झाले आहेत. बार्शी व वैराग मिळून 67 कोटी 77 लाख 42 हजार रुपये वसुली झाली आहे. मंगळवेढा व मरवडे मिळून 31 कोटी 36 लाख 14 हजार रुपये वसूल झाले आहेत. सीमा भाग व मंद्रुप मिळून 45 कोटी 82 लाख 15 हजार रुपये कर्ज वसुली करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात 27 कोटी 63 लाख 69 हजार रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. एकूण कर्जाची थकबाकी व वसुली पाहाता जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 43 टक्के कर्ज वसुली झाली आहे व जवळपास 56 टक्के कर्ज वाटप झाले आहे.