Sat, Jul 20, 2019 15:38होमपेज › Solapur › तुळजापूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

तुळजापूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

Published On: Jun 23 2018 10:57PM | Last Updated: Jun 23 2018 10:31PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

यात्रा अनुदान गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल सहा महिने गैरहजर राहिलेल्या तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

समाजसेवक राजाभाऊ माने यांनी याबाबतची तक्रार गेल्या वर्षी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. अर्चना गंगणे या विद्यमान सभागृहात थेट जनतेतून निवडून आल्या असल्या तरी पूर्वीच्या सभागृहातही त्या नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारकडून आलेल्या 1 कोटी 62 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासोबतच तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळेंसह 15 नगरसेवक, लेखापाल आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने बहुतांशजण फरार झाले होते. नगराध्यक्षा गंगणेही सहा महिने पालिकेकडे फिरकल्याच नव्हत्या. त्यामुळे पालिकेवर प्रशासक नेमावा व गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवकांना व नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्याची मागणी माने यांनी केली होती. त्यावर वर्षभर सुनावणी सुरू होती. अखेर शनिवारी यावर अंतिम निकाल देत जिल्हाधिकार्‍यांनी अर्चना गंगणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसलाही दणका दिला आहे.

पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता

तुळजापूर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षा गंगणेही राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या आहेत. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्‍का बसला आहे.