Thu, Apr 25, 2019 14:16होमपेज › Solapur › नवीन रेल्वे मार्गासंदर्भात बैठकीत चर्चा

नवीन रेल्वे मार्गासंदर्भात बैठकीत चर्चा

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 10 2018 1:18AMउमरगा : प्रतिनिधी

लातूर-गुलबर्गा व सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वेमार्गासह उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भात शुक्रवारी 7 सप्टेंबर रोजी पुणे येथील रेल्वेच्या झालेल्या विभागीय बैठकीत विविध विकासाच्या महत्त्वपूर्ण मुद्यांकडे खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यासह इतर खासदारांनी लक्ष वेधले.

पुणे येथे रेल्वेच्या विविध विकासकामांबद्दल सोलापूर मंडळ अंतर्गत लोकसभा सदस्य यांच्यासोबत शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत खा. शिवाजी आढळराव पाटील, खा. श्रीरंग बारणे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. अनिल शिरोळे, खा. वंदना चव्हाण, खा. प्रा.रवींद्र गायकवाड, सदाशिव लोखंडे, खा. उदयनराजे भोसले, खा. धनंजय महाडिक, खा. संजय पाटील, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, वरिष्ठ अधिकारी, सोलापूरचे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांच्यासह मध्य रेल्वेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भात खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांनी लातूर-गुलबर्गा या नवीन रेल्वेमार्गाच्या उर्वरित कामास तत्काळ निधी उपलब्ध करून देणे, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वेमार्गास पिंकबुक सन 2018-19 समाविष्ट केले असून नवीन रेल्वेमार्गाच्या कामाची कार्यवाही तत्काळ सुरू करणे, कळंब रेल्वेस्थानकातील रेल्वे प्रवाशांबाबतची अनेक दिवसांपासून असलेली अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करणे व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे, कोल्हापूर-नागपूर व्हाया उस्मानाबाद मार्गे जाणारी रेल्वे व हैदराबाद-पुणे ही रेल्वे नियमित चालू करण्यात यावी, उस्मानाबाद-लातूर रेल्वे लाईन वरील रेल्वे स्टेशन जवळील तेर ते ढोराळा रस्त्याचे गेट नं. 38 चालू करणे किंवा मजबुतीकरण करणे, बिदर-मुंबई गाडी नं. 22114 व लातूर गाडी नं. 22108 या गाड्यांचा कोटा, बोगी वाढून देणे, उस्मानाबाद रेल्वेस्थानकातील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वेची विविध विकास कामे तत्काळ पूर्ण करणे यासह रेल्वे तील महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करून लवकरात लवकर पूर्ण करावेत व रेल्वेच्या विविध योजना, विकासकामे आदी रेल्वेसंबंधित विविध मुद्यांवर अधिकार्‍यांशी चर्चा करून आपापल्या मतदारसंघातील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, नवीन मार्ग, विद्युतीकरणाच्या कामांवर लक्ष देण्याची सूचना उपस्थित खासदारांनी केल्या.