Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Solapur › भेदभावाला व्यापार्‍यांचा विरोध

लेज, कुरकुरेचे प्लास्टिक चालतं, मग आमचं का नाही?

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:51PMसोलापूर : प्रतिनिधी 

प्लॅस्टिक बंदीला आमचा पूर्ण पाठिंबा; पण याप्रकरणी होत असलेल्या कारवाईतील भेदभावाला आमचा विरोध  आहे. कारण, उच्च दर्जाच्या थ्री लेअर्स प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आम्ही खाद्यपदार्थ पॅक करतो. त्यावर कारवाई होते आणि आमच्यापेक्षा साधारण दर्जाचे प्लास्टिक वापरणार्‍या लेज, कुरकुरे, पार्ले बिस्कीट यासारख्या कंपन्यांवर कारवाई नाही. या शासनाच्या दुटप्पी भूमिकेने प्लास्टिक बंदीचा मूळ उद्देश साध्य होणार आहे का, असा सवाल संतप्त व्यापारी विचारत आहेत.

प्लास्टिक बंदीच्या कायद्यांतर्गत सोलापुरात  दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. काल एका दिवसात तब्बल सहाशे किलोपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त करत महापालिकेने 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, एखाद-दुसरे नॅशनल ब्रँड सोडले, तर लोकल ब्रँडवरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी या कारवाईचा निषेध नोंदवत काही वेळासाठी दुकानेही बंद केली.

नेमक्या कोणत्या प्लास्टिकवर कारवाई करणार याबाबत सोलापुरातील काही व्यापार्‍यांनी एकत्र येऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावेळी प्लास्टिक उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करणार बाकी दुकानांवर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, काल कारवाई करताना महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सरसकट सार्‍यांवरच कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

भाग्यश्री वडा हा सोलापुरातील उत्तम ब्रँड  आहे. वडा, चिवडा पॅक करण्यासाठी ते थ्री लेअर, लॅमिनेटेड 50 मायक्रॉनपेक्षा अधिक दर्जेदार प्लॅस्टिक पिशव्या वापरतात. व्हॅक्युम पॅक असे खाद्यपदार्थ विकतात. विशेष म्हणजे त्याचे ट्रेडमार्कही त्यांनी मिळवले आहे. तरीदेखील काल त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा भाग्यश्री चिवडाचे संचालक जोशी यांनी पथकाला विरोध केला. 

नव्या पेठेतील रोनक कलेक्शन या कपड्याच्या दुकानातही महापालिकेचे कर्मचारी पोचले त्यावेळी रोनक दुकानाचे नाव असलेली कॅरीबॅग त्यांच्याकडे नव्हती. मात्र नव्या साड्या व ड्रेसमटेरिअलला कंपनीकडून पॅक करून दिलेल्या प्लॅस्टिक आवरणाला अधिकार्‍यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी त्या पिशव्या कंपनीनेच पॅक करून पाठविल्यामुळे त्याचा दंड संबंधित कंपनीला करावा, अशी भूमिका घेत अधिकार्‍यांना विरोध केला. त्यामुळे अधिकार्‍यांना तेथूनही हात हलवत परत यावे लागले होते.

दुधाच्या पिशव्यांबाबतही ब्रँडेड डेअरीच्या दुधाच्या पिशव्यांना सवलत दिली आहे. मात्र सुटे दूध विकणार्‍या छोट्या दूध व्यावसायिकांनी प्लॅस्टिक पिशव्यात दूध पॅक करून विकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हा न्याय कुठला, असा प्रश्‍नही व्यापारी विचारत आहेत. प्लॅस्टिकबंदी हा अतिशय चांगला निर्णय आहे. मात्र मोठ्या कंपन्यांना सवलत व चांगला दर्जेदार ब्रँड असला तरी तो लोकल असल्यामुळे त्याच्यावर कारवाई या भेदभावामुळे  पर्यावरण वाचविणे व भूमि प्रदूषण रोखणे शक्य होणार नसल्याची प्रतिक्रियाही शहा ट्रेडर्सचे अतिश शहा यांनी दिली.