होमपेज › Solapur › महापालिकेत विरोधकांनाच शिवसेनेचा ‘जोर का झटका धिरे से’!

महापालिकेत विरोधकांनाच शिवसेनेचा ‘जोर का झटका धिरे से’!

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:06PMसोलापूर : प्रशांत माने

भाजपच्या राजकीय खेळीला बळी पडत शिवसेनेने खा. ओवेसी मानपत्रावरून एमआयएमशी पंगा घेतल्यामुळे पालिकेतील सर्व एकत्रित विरोधी पक्षांमधील एमआयएमची पतंग कटणार हे संकेत मिळाल्यानंतर विरोधकांना एकत्र करण्याचे कठीण काम करुन सात  विषय सभापतीपदांमध्ये वाटणी करण्यापेक्षा सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करीत सेनेने विरोधकांनाच ‘जोर का झटका धिरे से’ देत तीन सभापतीपदे पदरात पाडून घेतली. वर्षानंतर  होत असलेल्या भाजप-सेना युतीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसपा, माकप यांची आगामी भूमिका काय? अथवा सत्ताधारी सोयीनुसार सेनेसह विविध विरोधी पक्षांना जवळ करुन सत्तेची पोळी भाजून घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महापालिकेतील एकूण 102 नगरसेवकांपैकी सत्ताधारी भाजप 49, शिवसेना 21, काँग्रेस 14, एमआयएम 9, राष्ट्रवादी 4, बसपा 4, माकप 1 असे पक्षीय बलाबल आहे. सर्वसाधारण सभेत बहुमतासाठी 53 नगरसेवक सदस्यांची भाजपला आवश्यकता पडते. सत्ताधारी भाजपकडे 49, तर सर्व विरोधी पक्षांकडे मिळून 53 नगरसेवक आहेत. त्यामुळे सर्व विरोधक जर एकत्र आले तर सत्ताधारी भाजपला अडचणीचे होते. विरोधकांनी एकत्र येत आजपर्यंत अनेकदा सत्ताधारी भाजपला खिंडीत गाठून पराभवाचा दणका दिलेला आहे.

विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या 49 नगरसेवकांमध्ये गट पडलेले असून पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाकडे 33 आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख  गटाकडे 16 नगरसेवक आहेत. दोन देशमुखांच्या गटामधील वादामुळे पालिकेतील भाजपचे सत्तेचे संपूर्ण एक वर्ष तर वाया गेलेच, पण शहराचा विकासदेखील रखडलेलाच दिसून आला. गतवर्षी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धोबीपछाड देत सात सभापतींपैकी पाच सभापतीपदे पटकावली होती.  दोन सभापतीपदे भाजपला चिठ्ठीद्वारे नशिबाने मिळाली होती. भाजपमधील वादामुळेच स्थायी सभापतीपददेखील सेनेच्या मार्गावर आहेे. परिवहन सभापदीपद शिवसेनेकडेच आहे.

भाजपमधील  गटातटाचा वाद इतका विकोपास गेला होता की, महापौरांनी 12 महिन्यांत 15 सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा विक्रम केला होता. वादाची चर्चा वरपर्यंत गेल्यानंतर  मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांसह सर्व नगरसेवकांना रात्री 12 वाजता थेट मुंबईत ‘वर्षा’वर पाचारण करीत वाद मिटवा अन्यथा महापालिकाच बरखास्त करतो, अशी तंबी दिली होती. त्यानंतरही छोटे-मोठे वाद सुरुच होते. परंतु पक्षनेतेपदी संजय कोळी यांची निवड झाल्यानंतर मात्र दोन्ही मंत्री देशमुख गटामधील वाद थंडावल्याचे चित्र आहे. महापौर व पक्षनेते एकत्रित काम करीत असल्याने पालिकेत भाजपचा गाडा थोडासा सुरळीत चालल्याचे चित्र आहे.

पाच विरोधी पक्षांमधील एमआयएमची नाराजी आणि दोन्ही देशमुख गट एकत्र येत असल्याचे जाणवताच महापालिकेतील राजकीय धुरंधर सेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी विरोधकांना एकत्र करण्याचा नाद सोडत थेट सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करत सात विषय समित्यांपैकी तीन समित्यांचे सभापदीपद पदरात पाडून घेण्यात यश मिळवले आहे. पुढीलकाळात भाजप सेनेला आणखीन जवळ करते का प्रसंग पाहून सोयीनुसार  विविध  विरोधी पक्षांना हाताशी धरून सत्तेची  पोळी  भाजून घेते, हे आगामीकाळातच स्पष्ट होणार आहे.

कोळी पक्षनेते झाले अन् भाजपमधील वाद संपुष्टात

जानेवारी 2017 मध्ये भाजप महापालिकेत सत्तेवर आला. मार्च 2018 पर्यंत पालिकेत भाजपमध्ये दोन मंत्री देशमुख गटांमध्ये प्रचंड वाद होता. सहकारमंत्री गटाचे नेतृत्व महापौर शोभा बनशेट्टी, तर पालकमंत्री गटाचे नेतृत्व संजय कोळी हे करतात. या दोघांमध्ये सभागृहातच वाद झाल्याचे सर्वश्रृत आहे. स्थायी सभापतीपदावरुन पायउतार होताच तत्काळ पक्षनेतेपदाची माळ गळ्यात पडल्याने संजय कोळी हे भाग्यवान मानले जातात. पक्षनेते होताच कोळी यांनी पक्षांतर्गत वादाला फाटा देत महापौर व सहकारमंत्री गटाशी जुळवून घेतल्याचे चित्र पालिकेत दिसत आहे. कोळी पक्षनेते झाल्यापासून सत्ताधारी भाजपचे सर्व डाव यशस्वी होताना दिसत आहेत.