Thu, Apr 18, 2019 16:40होमपेज › Solapur › राज्यात दरमहा दीड लाख लोकांना डायलेसिस : डॉ. लहाने

राज्यात दरमहा दीड लाख लोकांना डायलेसिस : डॉ. लहाने

Published On: Jul 27 2018 11:47PM | Last Updated: Jul 27 2018 11:12PMसोलापूर : प्रतिनिधी

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. आहारातील चुकीच्या पद्धतीमुळे डायलेसिस रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक असून राज्यात दरमहा सुमारे दीड लाख रुग्णांना डायलेसिस करावे लागत असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात विविध संस्थांच्या देणगीतून उभारण्यात  आलेल्या डायलेसिस युनिटचे लोकार्पण डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद कुलकर्णी, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद, लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार उपस्थित होते. 

प्रारंभी डायलेसिस युनिटचे फित कापून उद्घाटन झाले.  डॉ. लहाने पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अवयवदानाची चळवळ वाढवण्याची गरज आहे. राज्यात वर्षभरात 60 ते 70 हजारजणांचा अपघात होतो. त्यातील अनेकजण ब्रेनडेड होतात, काहीजण मरण पावतात. मात्र अशा रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व समजलेले नसते. ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानासाठी व्यापक प्रबोधनाची गरज आहे. सोलापुरात ही चळवळ रुजत असल्याचे समाधान आहे. 

रोजचा आहार संतुलित हवा

अमेरिकेसह इतर प्रगतशील देशांत आहाराबाबत कमालाची काळजी घेतली जाते. त्यामुळे तेथे आजारी पडण्याचे प्रमाण तुलनेत कमी असते. भारतात मात्र आहाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आधुनिक जीवनशैलीच्या अतिरेकामुळे किडनी निकामी होणे, मधुमेह, हृदयविकार आदी आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. निरोगी जगण्यासाठी आहारावर नियंत्रण, पुरेसा व्यायाम तसेच अति डायटिंगवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 

यावेळी डॉ. सुनील घाटे, डॉ. सुहासिनी शहा, डॉ. प्रमोद कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली. कवी देवेंद्र औटी यांनी कविता सादर केली. डायलेसिस युनिटसाठी सव्वा लाख रुपयांची मदत दिल्याबद्दल परिचारिका असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचा डॉ. लहाने यांच्या हस्ते सत्कार झाला. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. एच. बी. प्रसाद यांनी केले. यावेळी माजी आ. धनाजी साठे, डॉ. मंजिरी चितळे, डॉ. शिरीष कुमठेकर आदींसह शहरातील डॉक्टर्स, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रिसिजन फौंडेशन देणार आणखी दोन मशिनी

या युनिटमध्ये सध्या तीन डायलेसिस मशिनी कार्यान्वित करण्यात आली असून त्यापैकी दोन मशिनी प्रिसिजन फौंडेशने दिल्या आहेत. पुढील आर्थिक वर्षात आणखी दोन मशिनी प्रिसिजनतर्फे देऊ, अशी घोषणा यावेळी डॉ. सुहासिनी सहा यांनी केली. उर्वरित मशिनी तसेच इतर सुविधांसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले. या युनिटसाठी बँका, सामाजिक संस्था तसेच दानशूर लोकांकडून देणग्यांचा ओघ सुरु असल्याचे डॉ. घाटे यांनी सांगितले.