Thu, Jan 17, 2019 16:24होमपेज › Solapur › विकास संस्थांनी स्वनिधी उभारावा : सुभाष देशमुख 

विकास संस्थांनी स्वनिधी उभारावा : सुभाष देशमुख 

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 10:50PMपंढरपूर : प्रतिनिधी 

गावोगावी असलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्था यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जपुरवठा करत नाही म्हणून कर्जवाटप करणे थांबवू नये. गावाचा, राज्याचा व देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून स्वनिधी उभारून विविध उद्योग सुरु करावेत. या उद्योगाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी गावाच्या विकासासाठी वापरावा. निधी उभारताना अडचणी येत असतील तर राज्य सहकारी बँक व एमसीडीसीच्या माध्यमातून संस्थाना कर्ज देण्यास मी तयार आहे.असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी केले.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, जिल्हा व तालुका खरेदी विक्री संघ व विकास सोसायटी यांना बळकट करण्यासाठी अटल महापणन विकास अभियान पूर्ण विभाग स्तरीय कार्यशाळा सिंहगड महाविद्यालय पंढरपूर येथे शुक्रवारी संपन्न झाली. याप्रसंगी ना. देशमुख बोलत होते.पुढे बोलताना ना. देशमुख म्हणाले की, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी कर्जवाटपाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली नसल्याने विकास संस्था बुडीत निघाल्या आहेत. ज्या संस्थांनी अनुदान घेतले त्या संस्था डबघाईला आल्या तर ज्या संस्थांनी अनुदान न घेता विविध उद्योगांच्या माध्यमातून स्वनिधी उभारला आज त्याच संस्था टिकून आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विकास संस्थांना कर्जपुरवठा करण्यात येत नसल्याने शेतकर्‍यांना कर्जवाटप करताना अडचणी येत असतील तर अशा विकास संस्थांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भागभांडवल परत करावे. अशा संस्थांना सहकार व पणन विभागाकडून विशेष प्रयत्न करुन एमसीडीसी व राज्य सहकारी बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.   त्याचबरोबर विकास संस्थांच्या चेअरमन व मंडळांनी संस्थेत स्वनिधी उभारावा. व संस्थेच्या माध्यमातून विविध उद्योग सुरु करावेत असे सांगून कर्जमाफीची कार्यवाही सुरु असून ज्यांचे कर्ज माफ झाले आहे. त्यांनी कर्जमाफ झाल्याचा दाखल घेऊन परत नव्याने बँकेकडे कर्जमागणी करावी असे आवाहन ना. देशमुख यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, डॉ. राजाराम दिघे, दीपक तावरे, पी.टी. घुगे, भाजपा तालकुाध्यक्ष श्रीकांत बागल,शहराध्यक्ष संजय वाईकर आदींसह विकास संस्थांचे पदाधिकारी उपस्थीत होते.