Fri, Apr 19, 2019 13:54होमपेज › Solapur › नवीन वस्त्रोद्योग धोरणात गारमेंटला प्राधान्य : देशमुख

नवीन वस्त्रोद्योग धोरणात गारमेंटला प्राधान्य : देशमुख

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:32PMसोलापूर ः  प्रतिनिधी

राज्य सरकारचे नवीन वस्त्रोद्योग धोरण लवकरच जाहीर होणार असून त्यामध्ये गारमेंटला प्राधान्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी केले, तर  उद्योगाच्यादृष्टीने भौगोलिकसह विविध अनुकूलता असलेले सोलापूर हे देशाचे गारमेंट हब व्हावे, अशी इच्छा  ज्येष्ठ उद्योगपती ऋषिकेश मफतलाल यांनी प्रदर्शित केली.

सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघातर्फे हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित दुसर्‍या आंतरराष्ट्रीय गणवेश, गारमेंट व होम टेक्स्टाईल  प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक अजयकुमार साहू, मफतलालचे मार्केटिंग  प्रेसिडेंट एम.बी. रघुनाथ, संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, उपाध्यक्ष नीलेश शहा, सहसचिव अमितकुमार जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढीलवर्षी केनियात प्रदर्शन : देशमुख 

यावेळी पुढे बोलताना  ना. देशमुख म्हणाले,  पहिल्या वर्षी आयोजित प्रदर्शनाचे फलित म्हणून दुसर्‍या वर्षी दुप्पट प्रतिसाद मिळाल्याचे आज दिसून येत आहे. एवढेच नव्हे चार नवीन गारमेंट फॅक्टर्‍याही सोलापुरात सुरु झाल्या. केवळ देशातूनच नव्हे तर विदेशातूनही या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळून सोलापुरातील गारमेंट उद्योगाची प्रगती होणार यात शंका नाही. पुढील काळात आणखीनच जबाबदारी वाढणार आहे.  सोलापुरी ब्रॅँड होण्यासाठी आणखीन खूप मेहनत घ्यावी लागेल. याकरिता गारमेंट टीमची मदत मिळाली आहे. आता गारमेंटचे पुढील प्रदर्शन केनिया येथे घेण्यात येईल. गारमेंट पार्कसाठी भेडसावणार्‍या जागेचा प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न असून 25 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता चिंचोळी, अक्कलकोट रोड, होटगी रोड आदी पर्यायांचा विचार केला जात आहे. धूम्रपान कायद्यामुळे अडचणीत आलेल्या विडी उद्योगातील कामगारांना एक पर्यायी रोजगार म्हणून गारमेंट उद्योगात संधी देण्याची योजना आहे. कौशल्य विकास योजनेद्वारे या कामगारांना प्रशिक्षण देण्यात येईल. हिरज येघे रेशीम पार्कसाठी जागा उपलब्ध झाली असून टेक्स्टाईल पार्क, मेगाक्‍लस्टर सुरु करण्याचे प्रयत्न आहेत. चादर-टॉवेलबरोबरच गारमेंटबाबत सोलापूरचे नाव व्हावे याकरिता सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे, असे ना. देशमुख म्हणाले.

पुन्हा सोन्याचा धूर निर्माण करणार : पालकमंत्री

एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असणार्‍या सोलापुरातील गिरण्या काळाच्या ओघात बंद पडल्या. नंतर ही जागा टेक्स्टाईल उद्योगाने घेतली, पण दुर्दैवाने हा तसेच विडी उद्योगदेखील अडचणीत आहे. सध्या गारमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उद्योगाचा आता देश-विदेशात  प्रचार करणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून हे प्रदर्शन भरविले आहे. गारमेंट-टेक्स्टाईल हब, मेगाक्‍लस्टर यासह विविध योजना राबवून पुन्हा एकदा सोलापुरात सोन्याचा धूर निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे.

देशात सर्वत्र प्रदर्शने भरवावीत : मफतलाल

याप्रसंगी बोलताना ऋषीकेश मफतलाल म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून सोलापुरातील गारमेंट उद्योगाचा मार्गदर्शक म्हणून काम करीत आहे याचा मला अभिमान आहे. आंध्र, कर्नाटकला जोडणारे सोलापूर शहर भौगोलिक व अन्य अनुकूलतेमुळे महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व भारतीय राजदूतांना पत्र पाठवून गारमेंटबाबत सोलापूरला मदत करण्याचे आवाहन केले आहे. वस्त्रोद्योगमंत्री देशमुख हेही या उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. येथील प्रसिद्ध असलेला टेक्स्टाईल उद्योग वाढणे गरजेचे आहे. गारमेंट उद्योगाच्या उन्नतीसाठी देशभरात प्रदर्शने भरविण्याची गरज आहे. सरकारकडून गणवेशासंदर्भात प्रति विद्यार्थी दोनशे रुपयांचे अनुदान दिले जाते. ते वाढवून अडीचशे रुपये करण्याची गरज आहे, अशी मागणी मफतलाल यांनी केली.

गारमेंटसोबत टॉवेलही प्रदर्शनात : जाजू

या प्रदर्शनात केवळ गारमेंटची उत्पादने नव्हे तर सोलापूरच्या टेक्स्टाईलचे प्रमुख उत्पादन असलेल्या टॉवेलचाही अंतर्भाव केला आहे. बाहेरील खरेदीदारांची गैरसोय होऊ नये म्हणून गारमेंट पार्कची योजना आखण्यात आली आहे. मात्र याकरिता शासनाकडून अद्याप जागा मिळाली नाही. पार्क झाल्यास या उद्योगात मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. विडी कामगारांना प्रशिक्षण देऊन गारमेंटमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. यादृष्टीने प्रशिक्षण केंद्रही सुरु केले आहे. गारमेंट उद्योजकांची व्यवहारात आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून रेडिमेड कापड उत्पादन संघ आवश्यक उपाय योजणार आहे.

यावेळी नीलेश शहा, अजयकुमार साहू आदींनी मनोगत व्यक्त केले.  कार्यकमास डी. रामरेड्डी, पेंटप्पा गड्डम, राजू राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले. प्रकाश पवार यांनी आभार मानले. प्रदर्शनात एकूण 32 स्टॉल्स असून सुमारे पाच हजारांहून अधिक लोक या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. विविध 12 देशांतील खरेदीदारही भेट देणार असून हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे.