Sat, Jul 20, 2019 10:42होमपेज › Solapur › ठेवी वाढवा आणि वसुली करा : प्रशासक

ठेवी वाढवा आणि वसुली करा : प्रशासक

Published On: Aug 08 2018 10:31PM | Last Updated: Aug 08 2018 10:12PMसोलापूर : महेश पांढरे   

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासक असून त्यांनी जे काम संचालक मंडळांनी करणे गरजेचे होते ते काम प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना करण्याची वेळ आली आहे. सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असून बँकेला वाचविण्याची जबाबदारी आता कर्मचारी, अधिकार्‍यांवर आली असून बँकेच्या ठेवींबरोबरच आता कर्ज वसुलीवरही लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना प्रशासक म्हणून अविनाश देशमुख यांनी दिल्या आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली थकली असून बड्या कर्जदारांकडे बँकेच्या मोठ्या रकमा अडकून पडल्या आहेत. त्यामुळे त्या कर्जाच्या वसुलीची कारवाई सुरु झाली असून काहींच्याबाबतीत न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आता बँकेला वाचविण्याची जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बँकेला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्याची खरी जबाबदारी संचालक मंडळ आणि विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची होती. मात्र ज्या लोकांना कर्ज दिले आहे ते पूर्वी बँकेेचे पदाधिकारीच होते. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळातील लोकांच्याच संस्थांकडे कोट्यवधी रुपयांची कर्जे थकली आहेत. त्यामुळे बँक खर्‍याअर्थाने आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी या वसुलीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्जाचा आकडा वाढतच गेला असून त्याचा फटका आता सर्वसामान्य शेतकर्‍यांना बसत आहे. जिल्हा बँकेवर अनेक कर्मचारी आणि शेतकर्‍यांची रोजीरोटी अवलंबून आहे. त्यामुळे बँकेला आता पुनर्वैभव प्राप्त करुन देण्याची खरी जबाबदारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांची असून अधिकार्‍यांनी आपापल्या शाखेत येणार्‍या ग्राहकांना विनंती करुन बँकेत ठेवी वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. 

काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी बँकेची चर्चा सातत्याने होत असल्याने ठेवीदार ठेवी ठेवण्यास तयार होत नसल्याच्या तक्रारी सांगितल्या आहेत. त्यामुळे पुन्हा प्रशासक म्हणून मोठ्या कर्जदारांची वसुली करणे अपेक्षित असून ही वसुली झाली तरच बँकेला पुनर्वैभव प्राप्त होणार असल्याची भावना सर्वसामान्य शेतकर्‍यांनी बोलून दाखविली आहे.

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे; कर्मचारी अस्वस्थ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जीवावर अनेक लोक मोठे कारखानदार झाले. अनेकांनी जमिनी घेऊन बागायतदार झाले. काहींनी बँकेच्या कर्जावर राजकीय पदे मिळविली. ती मंडळी कर्जे थकवून सध्या बँकेतून पसार झाली आहेत आणि बँक वाचविण्याचे ओझे आता अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर लादले जात आहे. हे कर्मचार्‍यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.