Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Solapur › पेट्रोल पंप मालकांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी 

पेट्रोल पंप मालकांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी 

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 9:40PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी शहर व तालुक्यात खंडणीखोरांनी अक्षरश: धूमाकुळ घातला आहे. मुंबई क्राईम ब्रँचचा पोलिस निरीक्षक असल्याची बतावणी करून बार्शी शहरात पेट्रोलपंप मालकाकडे खंडणीची मागणी केल्याची घटना ताजी आहे. त्यानंतर आता दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा पांगरी (ता. बार्शी) येथील पेट्रोलपंप मालकाकडे 5 लाखांची खंडणी मागितली आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही या खंडणीखोरांनी दिल्याने पेट्रोलपंप मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.  

खंडणी मागितल्याप्रकरणी साईराज पाटील याच्याविरुद्ध पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शिवाजी मुळे (वय 47, रा. उक्कडगाव, ता. बार्शी) या पेट्रोल पंप मालकाने याबाबत पांगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दीपक मुळे यांचा पांगरी-येरमाळा मार्गावर पांगरीपासून एक किलोमीटर अंतरावर शिवतारा किसान सेवा केंद्र या नावाने पेट्रोलपंप आहे. शेती व पेट्रोलपंपाचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते पंपाच्या कार्यालयात बसले असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर एकाने फोन करून तो मुंबई क्राईम ब्रँचमधून पोलिस निरीक्षक साईराज पाटील बोलत असल्याचे सांगितले. मी एक आरोपी मुंबईमध्ये पकडलेला आहे. त्याने तुला एक पिस्तुल दिलेली आहे, अशी कबूली त्याने दिली आहे.

बनावट शस्त्र बाळगल्याप्रकरणी मी तुझा पेट्रोलपंप सील करू शकतो. तसे करायचे नसल्यास तू आम्हाला 5 लाख रूपये दे, प्रकरण मिटवतो, असे सांगितले. साईराज पाटील याने वारंवार फोन करून तुझा पेट्रोलपंप सील करून तुला कामाला लावणार आहे, तू मला 5 लाख रूपये देणार आहेस की नाही, तू 5 लाख रूपये नाही दिलेस तर मी तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. 

यावर फिर्यादी मुळे यांनी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे सांगितले. त्यानंतर मात्र खंडणी मागणार्‍याने मुळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळी व दमदाटी केली. याबाबत पंप मालक मुळे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून साईराज पाटील याच्याविरोधात खंडणीची व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार मनोज भोसले हे करीत आहेत.