Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Solapur › सोलापूर विद्यापीठातील १८ संशोधक विद्यार्थ्यांची पीएचडी रद्द करण्याची छावा संघटनेची मागणी

सोलापूर : १८ जणांची पीएचडी रद्द करण्याची मागणी

Published On: May 17 2018 9:31PM | Last Updated: May 17 2018 9:31PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाने १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सामाजिक शास्त्रविभागातून १८ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. या प्रदान केलेल्या १८ पदव्या नियमबाह्य असून त्या पदव्या विद्यापीठाने रद्द कराव्यात अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. तर या प्रकारात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे यामागणीचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना देण्यात आले.

नियमानुसार डीआरसी व आरसीसी ची बैठक झालेली कोणतेही नोंद विद्यापीठाकडे नाही. तसेच या १८ विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही. सामाजिक शास्त्रे विभागाने या विद्यार्थ्यांना नियमबाह्य पदव्याप्रदान केल्या आहेत. या पदव्या रद्द करून या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक व बहिस्थ परीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात आली. तर दोषींवर कारवाई न केल्यास 30 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी योगेश पवार, गणेश मोरे, ओंकार यादव, धनराज कोकणे, मनोज चिंता, महेश भिमदे आदी उपस्थित होते.

सामाजिक शास्त्र विभागातून प्रदान करण्यात आलेल्या सर्व पदव्या यानियमानुसारच आहेत. पीएचडी पदवी प्रदान करताना युजीसीच्या सर्व नियमांचे विद्यापीठाने पालन केले आहे. संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांची डीआरसी व आरआरसीची बैठक घेण्यात आली आहे. तसेच मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासंबंधित सर्व दस्तावेज विद्यापीठाकडे आहे. - डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, सोलापूर विद्यापीठ.