Mon, Apr 22, 2019 12:35होमपेज › Solapur › मोदी सरकारची बदनामी : प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पोलिसात तक्रार

मोदी सरकारची बदनामी : प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पोलिसात तक्रार

Published On: Jul 06 2018 2:27PM | Last Updated: Jul 06 2018 2:27PMपंढरपूर  : प्रतिनिधी 

भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात हेतुपुरस्सर मोदी सरकारची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये शहर भाजप  अध्यक्ष संजय वाईकर यांनी लेखी तक्रार केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बेताल वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाची मागणी केली आहे. या तक्रारीची एक प्रत त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनाही पाठविलेली आहे.

या संदर्भात पंढरपूर शहर  पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारीत म्हटले आहे की, भारतीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने बुधवार दि. 4 जुलै 2018 रोजी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारिपचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  मोदी सरकार विरोधात केलेल्या आरोपामुळे बदनामी झाली आहे. म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे.

या सभेमध्ये बोलताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘ मोदी सरकार महाचोर असून काम करण्यासाठी पैसे घेत नाही, पण ज्याला काम मिळते त्याच्या उत्पन्नातून पार्टी फंडाच्या नावाने पैसे उकळते’ असा आरोप केलेला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक बड्या नेत्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला आहे, हे त्यांनीच सांगितले. मग सरकार आल्यावर कारवाई का केली नाही? त्यांनी कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून फी घेतली  म्हणूनच त्यांच्यावर कारवाई केली नाही, असाही आरोप आंबेडकरांनी या सभेत केला. या आरोपामुळे मोदी सरकारची गंभीर बदनामी झाली आहे.

 त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे हरकतीचेही आहे व बदनामी करणारेही आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोदी सरकारचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे व समाजामध्ये चुकीचा संदेश त्यांच्या वक्तव्यामुळे गेलेला आहे. त्यामुळे भारतीय दंड संविधानाच्या कलमानुसार गुन्हा ठरणारे वक्तव्य आहे.


अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्ष, मोदी सरकार यांची माहिती असताना हेतुपुरस्सर वाईट हेतूने गुन्हेगारी कृत्य करत जाणिवपुर्वक बदनामी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विरूद्ध व संबंधितांविरूद्ध पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीतून भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी केली आहे.