Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच निर्णय : सहकारमंत्री 

मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच निर्णय : सहकारमंत्री 

Published On: Aug 10 2018 11:56PM | Last Updated: Aug 10 2018 11:08PMसोलापूर : प्रतिनिधी   

मराठा आरक्षणासंदर्भात वेगाने हालचाली सुरू आहेत. मराठा आंदोलकांनी 9 ऑगस्ट 2017 रोजी शासनाला दिलेल्या निवेदनात ज्या मागण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण, तर मराठा तरुणांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

ना.  देशमुख यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात शासन सकारात्मक आहे. त्यासाठीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तोपर्यंत सरकारी नोकर्‍यांत 16 टक्के जागा रिक्‍त  ठेवण्यात येणार असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्या जागा भरण्यात येणार आहेत. दुसरीकडे मराठा समाजातील तरुणांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तत्काळ वसतिगृह उभे करण्याचे काम सुुरू आहे. विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या निकषांनुसार 10 हजारांपर्यंत शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ताही देण्यात येणार आहे. मराठा समाजातील युवकांना रोजगारनिर्मिती करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या कर्जाची हमी शासन स्वतः घेणार आहे. त्यामुळे लवकरच बँकांची बैठक घेऊन ही प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याविषयीच्या सूचना देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे जवळपास 12 हजार युवकांनी अर्ज केले असले तरी त्यापैकी केवळ चारशे ते पाचशे लोकांना कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे यापुढे कर्जाची हमीच शासन घेणार आहे. त्यामुळे बँकांना आता कर्जवाटपासाठी कोणतीच अडचण नसल्याचे ना.सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

मंद्रुप येथे लवकरच तहसील कार्यालय
दक्षिण तालुक्याची व्याप्ती पाहता क्षेत्रफळाच्यादृष्टीने हा तालुका मोठा असून लोकांना सोलापूरला येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दक्षिणमधील काही गावांसाठी मंद्रुप येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करण्यात येणार असल्याची माहितीदेखील याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.