Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Solapur › दीड लाखाची कर्जमाफी, पण आधी भरा थकबाकी

दीड लाखाची कर्जमाफी, पण आधी भरा थकबाकी

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:01PM-रामकृष्ण लांबतुरे 

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जगाचा पोशिंदा असलेल्या  बळीराजाला फक्त दीड लाखाची कर्जमाफी मिळत आहे. शेतीवर किती खर्च होतो, उत्पन्न किती मिळते  याचा अभ्यास करण्यास सरकार कमीच पडले. असो, तरीही शेतकर्‍यांनी थकबाकी भरुन आपल्या पदरात दीड लाखाची कर्जमाफी  पाडून घेणे,  हेच त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असणार्‍या जवळपास 16 हजारांच्यावर शेतकर्‍यांची नावे या शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहेत. मात्र यातील ओटीएसचा (वन टाईम सेंटलमेंट) वापर करुन फक्त चार हजार शेतकरी दीड लाखावरची थकबाकी भरुन  या दीड लाखाच्या कर्जमाफीचा फायदा घेऊ शकले. आणखी 12 हजार शेतकर्‍यांना जादा थकबाकी असल्याने भरणे मुश्कील झाले आहे. त्यांच्याकडे पैसे असले असते तर कशाला त्यांनी कर्जमाफी मागितली असती, असा सवाल ते मायबाप सरकारला विचारत आहेत. मात्र या मायबाप सरकारला त्याचा पाझर फुटत नाही. सत्ताधार्‍यांनी कर्जमाफीचा अभ्यास करुन जाचक अटी घालून फक्त दीड लाखाचीच कर्जमाफी दिली आहे. त्यासाठीही वरची थकबाकी भरणे आवश्यक केले आहे. छोटी-मोठी लाखापर्यंत, दीड लाखापर्यंत असलेली थकबाकी भरुन दीड लाखाच्या कर्जमाफीचा काहींनी फायदा घेतला. मात्र ज्यांची दोन लाखांवर थकबाकी आहे त्या शेतकर्‍यांनी कोठून पैसा आणायचा, याचा विचार सरकारला शिवला नाही. 

त्यामुळेच कर्जमाफी तर दिली; मात्र ती शेतकर्‍यांच्या  पदरी पडणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. मात्र त्यांच्या रागाला हातपाय नाहीत. त्यांच्याच नावाने राजकारण करुन मोठे झालेल्या संघटनांचे पक्षात रुपांतर झाले. त्यानंतर ते सत्ताधारीच्या खुर्चीत जाऊन बसले. इतकेच नव्हे तर ते कृषी राज्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र कर्जमाफीचे धोरण आखताना मात्र यांना ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्या शेतकर्‍यांचा विसर पडला, असेच म्हणावे लागेल. अशापरिस्थितीत पावसाने झोडपले आणि सरकारने झिडकारले तर कोणाकडे न्याय मागायचा या उक्तीनुसार बळीराजा, अन्नदाता उपाधी बहाल झालेल्या शेतकर्‍यांनी कोणाकडे न्याय मागायचा, हा एक यक्षप्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकारने 30 जूनपर्यंत दीड लाखावरची थकबाकी भरुन सरकारी दीड लाखाची कर्जमाफीचा लाभ घेण्याची डेटलाईन दिली आहे. ही पुढे वाढूही शकते. मात्र दीड लाखासाठी आधी थकबाकी भरण्याची तयारी शेतकर्‍यांना दाखवावी लागणार आहे.