Sun, Jun 16, 2019 03:11होमपेज › Solapur › घोषणा होऊन वर्ष लोटले तरी

कर्जमाफी :  35 हजार शेतकर्‍यांची नावेच नाहीत 

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 10:09PM  सोलापूर : महेश पांढरे 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेच्या घोषणेला तब्बल नऊ महिने लोटले तरी अद्याप जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना याचा लाभ होऊ शकला नाही. दुसरीकडे जवळपास 35 हजार शेतकर्‍यांची नावेच यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी योजना आता संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. राज्य शासनाने या कर्जमाफीची घोषणा 24 जून 2017 रोजी केली. यावेळी ग्रीन, यलो आणि व्हाईट यादी शासनाने जाहीर केली होती. यामध्ये ग्रीन लिस्टमध्ये आलेले शेतकरी पात्र ठरविण्यात आले होते.

मात्र, सोलापूर जिल्ह्यातील 35 हजार शेतकर्‍यांच्या यादीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ती यादी पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आली. मात्र, पुन्हा ही यादी शासनाच्या पोर्टलवर दिसलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 35 हजार शेतकरी आता कर्जमाफीसाठी लटकून पडले आहेत. दुसरीकडे शासनाने थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड कर्ज योजना अर्थात ओटीएस योजनेची घोषणा  केली होती.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 16000 शेतकरी पात्र ठरले होते. मात्र त्यापैकी तीन हजार शेतकर्‍यांनी या योजनेत पैसे भरले. काही शेतकर्‍यांना पैसे भरण्यात विलंब झाला. मात्र ज्यांनी वेळेत पैसे भरले अशा 600 शेतकर्‍यांचे जवळपास 12 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे पुन्हा ओटीएस योजनेतही शेतकरी लटकले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेली ही योजना फसवी असल्याचे आता वैतागलेले शेतकरी थेट बोलून दाखवत आहेत.