Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Solapur › पीक कर्जाचा बोजवारा; बळीराजा वेठीस

पीक कर्जाचा बोजवारा; बळीराजा वेठीस

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:03PMसोलापूर : इरफान शेख

जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य  एप्रिल  महिन्यात ठरविण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यातील  बँकांना  911.41 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र सध्या फक्त 25 टक्के झाले असल्याची माहिती समोर येत  आहे. सकारच्या ‘सुलभ पीक कर्ज’ अभियानाचा बोजवारा उडाला आहे. जिल्हा बँक, ग्रामीण बँका, राष्ट्रीय बँका व खासगी बँकांना पीक कर्ज वाटपाचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु पीक कर्ज देण्यात दिरंगाई झाल्याने  शेतकरीवर्ग  हवालदिल झाला आहे. जगाचा पोशिंदा  खासगी सावकांच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र  आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आजदेखील पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक राष्ट्रीय  बँका व खासगी बँकांनी टाळाटाळ केल्याने शेतकर्‍यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामात बँकांकडून मुबलक कर्ज उपलब्ध न झाल्याने उधारी, हातउसनवारी व दागिने गहाण ठेवून खरिपाच्या पेरण्या कराव्या लागत आहेत. शेतकर्‍यांच्या गळ्यातील सावकारी फास सुटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने राज्यभरातील व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग पेरणीस लागला आहे. सरकारने शेतकर्‍यांसाठी  ‘सुलभ  पीक कर्ज’ योजना आणली आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता 911.41 कोटी पीक कर्जवाटपाचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांत शेतकरीवर्ग हा एप्रिल महिन्यापासून बँकांचे हेलपाटे मारत आहे.