Wed, Jun 26, 2019 11:56होमपेज › Solapur › सोलापुरात तीस पक्ष्यांचा विषप्राशनामुळे मृत्यू

सोलापुरात तीस पक्ष्यांचा विषप्राशनामुळे मृत्यू

Published On: Aug 04 2018 7:58PM | Last Updated: Aug 04 2018 7:58PMवैराग : आनंदकुमार डुरे 

मालेगाव (ता. बार्शी ) येथील घोडके वस्तीवर तीसपेक्षा जास्त पक्षांचा विष प्राशनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पक्षी मृत्यूमुखी पडत असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वैराग-उस्मानाबाद राज्य मार्गावरील मालेगाव हद्दीत घोडके-पाटील वस्ती परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मोरांसह इतर पक्षी मृत अवस्थेत शेतकऱ्यांना आढळत आहेत. मृत पक्ष्यांमध्ये लांडोर, तितर, भारतद्वाज, होला, लवऱ्या यांचाही समावेश आहे.

दरम्यान मृत मोरांच्या पोटातून ज्वारी व मका आढळून आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशानेच करण्यात आला असावा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मृत तितर पक्षाचे शवविच्छेदन करून त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याच्या फॉरेन्सीक लॉबला पाठवण्यात आले आहेत. मालेगावमधील भौगोलिक स्थिती मोरांसाठी अनुकूल असल्याने या परिसरात मोरांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.

या वाढत्या संख्येचा फायदा अज्ञात शिकारी घेत असून मका व ज्वारीच्या धान्याला गुंगीचे औषध लावून शिकार करत आहेत. शेतकऱ्यांनी उंदरापासून पीकांचा बचाव करण्यासाठी शेतात ज्वारी किंवा मकेला औषध लावून टाकले असण्याची ही शक्यता आहे. या दोन्ही बाजूने वनविभाग तपास करीत आहे.

गेल्या चार -पाच दिवसांपासून मृत पडण्याचा प्रकार सुरू असून मोरांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून येत आहेत. वनविभागाने  तीन मोर, तीन लांडोर, एक तीतर, एक भारतद्वाज, एक होला, एक लवऱ्या, अशा अकरा पक्षांचा समावेश आहे, मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा आकडा मोठा असून कुजलेल्या अवस्थेत मृतसापळे ठिकठिकाणी सापडून येत आहेत. यावेळी घटनास्थळी मुख्य वन उपसंवरक्षक माळी, तहसिलदार ऋषिकेत शेळके, वैरागचे सपोनि ढोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपुते, वन कर्मचारी थोरात,पक्षीमित्र प्रतीक तलवाड, वैभव बोथरा आदींनी घटनास्थळी भेट दिली.