Fri, Jul 19, 2019 07:24होमपेज › Solapur › बंकलगी येथे काळविटाचा विहिरीत पडून मृत्यू

बंकलगी येथे काळविटाचा विहिरीत पडून मृत्यू

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:48PM

बुकमार्क करा
होटगी : प्रतिनिधी

बंकलगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू झाला. येथील शेतकरी रमेश जेऊरे यांना विहिरीवरील पाण्याचा पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या शेतातील विहिरीत काळविट पडल्याचे आढळून आले. ही खबर त्यांनी लागलीच त्यांच्या गावातील प्राणीमित्र अप्पू कोणदे आणि धुळखेडे यांना सांगितली, तेव्हा त्यांच्याकडून वनविभागास कळविण्यात आले. 

सकाळी आठ वाजता कळवून देखील वन विभागाकडून येण्यास उशीर लागल्याचे प्राणीमित्र अप्पू कोणदे यांनी सांगितले. याबाबत दक्षिण सोलापूर वन विभागाकडून आनास्था असल्याचे जाणवून आले. प्राणीमित्र अप्पू कोणदे आणि धुळखेडे सकाळी आठ वाजल्यापासून याठिकाणी गावातील काही युवक घेऊन या काळविटास बाहेर काढण्यासाठी थांबले होते. मात्र संबंधित विभागाकडून कुणीच लवकर घटनास्थळी पोहोचले नसल्याने प्राणीमित्र निघून गेले होते. निकेतन जाधव यांना विचारले असता त्यांना देखील याबाबतची माहिती नव्हती. घटनास्थळी सावंत वनरक्षकाला पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित वनरक्षकास संपर्क साधला असता सोलापुरात असल्याचे सांगितले. वनरक्षक घटनास्थळी दुपारी दीड वाजता पोहोचले. 

मृत काळवीट बाहेर काढण्यास उशीर झाल्याने जेऊरे यांना नाहक त्रास सहन करावा लागला. काळविटास बाहेर काढण्यास उशीर झाल्याने त्याची दुर्गंधी सुटली होती, त्यामुळे जेऊरे यांना आपल्या जनावरांना आणि पिण्यासाठी दुसर्‍याच्या शेतातून पाणी आणावे लागले. वनविभागाच्या उपस्थितीशिवाय काळवीट बाहेर काढणे म्हणजे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता असल्याने जेऊरे कुटुंबीयांनी त्रास सोसणे पत्करले असल्याचे रमेश जेऊरे यांनी सांगितले.

याबाबत वनरक्षक सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, आमची माणसे मृत काळविटाचा शोध घेण्यासाठी पुढे आली होती. घटनास्थळ सापडण्यास उशीर लागल्याचे सांगितले. काळविटाचा मृत्यू कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे काळवीट विहिरीत पडल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.