Sun, Aug 25, 2019 19:50होमपेज › Solapur › ट्रक उलटल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू

ट्रक उलटल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू

Published On: Feb 11 2018 10:41PM | Last Updated: Feb 11 2018 10:39PMनळदुर्ग : प्रतिनिधी

विरुद्ध दिशेने भरधाव येणार्‍या वाहनास बाजू देताना उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ऊसतोड मजुरांच्या एकाच कुटुंबातील तिघांचा  जागीच मृत्यू झाला; तर 14 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात तुळजापूर तालुक्यातील जळकोट-नंदगाव रस्त्यावर रविवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास झाला. मृतांमध्ये पती, पत्नी व त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

राजू मिठू राठोड (वय 35), ललिता राजू राठोड (30), स्वप्निल राजू राठोड (10, तिघेही रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर अनिता किसन पवार (35), धोंडिराम पुना पवार (35), सार्थिक राजू राठोड (5), सीमा धोंडिराम पवार (12), संदेश धोंडिराम पवार (5), पार्वती धोंडिराम पवार (35), प्रतीक्षा गोविंद पवार (18), इंदुबाई गोविंद पवार (45, सर्व रा. रामतीर्थ, ता. तुळजापूर), आदित्य परशुराम पात्रे (15), मोनाजी परशुराम पात्रे (12, दोघे  रा. साठेनगर, नळदुर्ग), कन्हैय्या जालिंदर दणाणे (22), शोभा जालिंदर दणाणे (दोघे रा. नंदगाव, ता. तुळजापूर), संगीता शिवाजी राठोड (50), शिवाजी खेमा राठोड (55, दोघे रा. मानमोडी, ता. तुळजापूर)  अशी जखमींची नावे आहेत. 

नंदगाव शिवारातील शेतकर्‍याच्या शेतातील उसाची तोड करण्यात येत होती. रविवारी उसाची तोड पूर्ण झाली. त्यानंतर उसाची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये ऊस भरल्यानंतर त्या ट्रकमध्ये ऊसतोड मजूर बसले. हा ट्रक धोत्री (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील गोकुळ साखर कारखान्याकडे निघाला होता. नंदगावपासून दोन किलोमीटरवर आल्यानंतर समोरून येणार्‍या एका वाहनाला बाजू देताना उसाचा ट्रक उलटला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले, तर 14 जण जखमी झाले असून, त्यांना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोलापूर  रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती समजताच जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, सपोनि प्रल्हाद सूर्यवंशी यांनी भेट दिली. हंगरगा तांडा येथील ग्रामस्थांनी जखमींना उसाच्या ढिगार्‍या खालून काढून उपचारासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ तांडा येथील ग्रामस्थ, नातेवाइकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.