Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › शहर, जिल्ह्याला डेंग्यूसदृश्य आजाराचा विळखा

शहर, जिल्ह्याला डेंग्यूसदृश्य आजाराचा विळखा

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:38PMपंढरपूर  : प्रतिनिधी

पंढरपूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू आणि डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले असून डेंग्यूची लागण दिसून आलेले रुण 100 पेक्षा जास्त असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही आरोग्य आणि मलेरिया विभाग सुस्त असल्याचे दिसत आहे. 

पंढरपूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यूसदृश्य आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून 200 पेक्षा जास्त रुग्ण शहरातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. सोलापूर, अकलूज येथेही काही रूग्ण उपचारासाठी दाखल झालेले आहेत. यापैकी जवळपास शंभरावर रूग्णांना डेंग्यूचे निदान झाले असून त्यांच्यावर पंढरपूर शहरातील  खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याशिवाय थंडीताप आणि इतर आजारांनीही गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. 

शहरातील इसबावी, मनिषानगर, संत पेठ, गोविंदपुरा, जुनी पेठ, विठ्ठल मंदिर, दाळे गल्ली परिसरात असे रूग्ण आढळून आलेले आहेत. या रूग्णांची बहुतांश खासगी रूग्णालयात भरती सुरू आहे. नगरपालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे तसेच सामान्य रूग्णालयात आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंढरपूरकरांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत पालिकेने गंभीर होण्याची गरज आहे.