Mon, Aug 26, 2019 08:31होमपेज › Solapur › करमाळ्यात दुग्ध उत्पादन निम्म्याने घटले

करमाळ्यात दुग्ध उत्पादन निम्म्याने घटले

Published On: May 16 2019 2:14AM | Last Updated: May 16 2019 2:14AM
करमाळा : अशोक नरसाळे

सततच्या दुष्काळामुळे दुभत्या जनावरांची खाण्याची आबाळ होत राहिल्यामुळे त्याचा परिणाम दूध व्यवसायावर झालेला आहे. ओला चारा, खुराक, पाण्याची टंचाई या गोष्टी शेतकर्‍यांकडून दूध देणार्‍या जनावरांना पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने दूध व्यवसायावर त्याचा वाईट परिणाम झालेला आहे. दररोज दीड लाख लिटरचे संकलन होणारे दूध आता केवळ 80 हजार लिटरपर्यंत होत आहे. दररोज दूध संकलनात सुमारे सव्वा लाखांची घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे.

यंदाचे खरीप, रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतात काम राहिलेले नाही. शेतीतून कसलेही उत्पन्‍न शेतकर्‍यांच्या पदरात पडलेले नाही. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. दरम्यान, दूध धंद्याला पोषक असलेला हिरवा चारा व पाण्याची तीव्र टंचाई यंदाच्या दुष्काळात निर्माण झाल्याने दुधाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. करमाळा तालुक्यात संकरीत गाय 30 हजार 048, तर देशी गायी 15 हजार 531, म्हैस 23 हजार 903 असे मिळून 70 हजार 482 पशुधन आहे.

गतवर्षातील मान्सूनमध्ये 25 टक्के पाऊस झाल्याने 90 टक्के विहिरी कोरड्या पडलेल्या असून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेल्याने जनावरांना चारा उपलब्ध होऊ शकलेला नाही. या कठीण परिस्थितीमध्ये टँकरच्या पाण्यावर व चारा छावण्यांवर जनावरांना पोसण्याची वेळ पशुपालकांवर येऊन ठेपलेली आहे. कडबा पेंडी 25 ते 30 रुपये, कडवळ 1500 रुपये गुंठा, उसाचे वाडे 4000 रुपये टन, मका 2500 रुपये, सरकी पेंड 1400 किलो, खपरी पेंड 2000  रूपये अशा चढ्या भावाने विकले जात आहेत. परंतु, पशुधन जगविण्यासाठी चारा विकत घेण्याची पाळी शेतकर्‍यांवर आलेली आहे. त्याचा फटका दूध  व्यवसायाला बसला आहे.

करमाळा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे दुधाचे उत्पादन घटले असून जिल्हा दूध संघ 14000, सोनाई दूध संघ 22000, वैष्णवी दूध संघ 3500, गोविंद दूध 11000, लोकविकास दूध 11500, दिगंबर दूध 6000, गणेश महाडिक दूध 8000 याप्रमाणे दररोज 76000 लिटर दूध करमाळा तालुक्यातून संकलित होत आहे. तालुक्यातील पूर्व भागातील शेतकर्‍यांचे दूध टेंभुर्णी व कुर्डूवाडीकडे तर पश्‍चिम भागातील दूध राशिन, भिगवणकडे संकलन होते. दुष्काळी परिस्थिती नसताना करमाळा तालुक्यात दररोज 1,55,000 ते 1,75,000 लिटर दूध संकलन होत होते. मात्र दुष्काळामुळे हे संकलन 50 टक्के कमी झाल्याचे दिसून येते.

दुधापेक्षा पाण्याची बाटली महाग 
1972 ला दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. 72 चा दुष्काळ अन्, धान्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी पाण्याची कमतरता नव्हती. यंदाच्या दुष्काळात अन्‍नधान्याची टंचाई नाही पण चारा पाण्याची टंचाई तीव्र बनल्याने दूध धंदा करणे अवघड बनले आहे. दुधाच्या फॅटनुसार 18 रु. लिटरचा भाव मिळत असून दुधापेक्षा पाणी महाग आहे. पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रु.ला तर दुधाची एक लिटरची बाटली 18 रु. मिळत आहे. त्यामुळे पाण्यापेक्षा दुधाची किंमत कमी झालेली आहे.

शेतीऐवजी दूध व्यवसायावर मागील 10 ते 12 वर्षांपासून लक्ष दिले. शेती परवडत नाही म्हणून दुधाचा व्यवसाय चालू केला. मात्र, आता दुष्काळामुळे हा व्यवसाय कोलमडून गेला. मायबाप सरकारने जर दूध व्यवसायाला अनुदानाच्या स्वरुपात मदत केली तरच शेतकरी व दुभती जनावरे जिवंत राहणार आहेत.

- कांतीलाल लांडगे, शेतकरी, मु.पो. पुनवर

शेती उद्योगाला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय महत्त्वाचा आहे. सहकारी दूध संस्था, दूध संघ काळाच्या ओघात नष्ट होत गेले. मात्र, शेतकरी व ग्रामीण अर्थकारण दुधाच्या व्यवसायावर अवलंबून असताना या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देऊन हा व्यवसाय जिवंत ठेवणे काळाची गरज आहे.

 मधुकर पवार, शेतकरी, मु.पो. हिरवाडी