होमपेज › Solapur › दूध ओतून दुग्धविकासमंत्र्याचा निषेध

दूध ओतून दुग्धविकासमंत्र्याचा निषेध

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 10:38PMसोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा निषेध करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून रस्त्यावर दूध  ओतून निषेध व्यक्त करण्यात आला. सोलापूर-विजापूर महामार्गावर रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दूध फेकून (फेकून) आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

सद्यस्थितीला प्रत्येक छोट्या-मोठ्या दुकानांत पाण्याची बाटली  महाग मिळते. परंतु शासन दुधाला योग्य भाव देत नसून उलट दुधाचे दर कमी केले जात आहेत. पोशिंदा कर्जबाजारी होत चालला आहे. अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्राच संपविली आहे. राज्य शासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाले पाहिजेत, अशा निषेधाच्या घोषणा देत प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्यावतीने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा निषेध करत मोठ्या प्रमाणात दुधाचे कँड महामार्गावर ओतण्यात आले. काही वेळेसाठी आंदोलकांनी महामार्ग क्र. 9 येथे रास्ता रोको आंदोलन केले.

महाराष्ट्रात  शेतकर्‍यांचे  अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. शासन या  समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. अशी व्यथा प्रहार संघटनेचे पदाधिकारी मांडत होते. शेतकर्‍यांना नाहक नुकसान सोसावे लागत आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने याला पूर्णतः शासन जबाबदार आहे. शेतकर्‍यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व शेतीमालाला योग्य भाव मिळावा.शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यात यावेत. दुधाला योग्य भाव द्यावा, या मागण्या करीत रस्त्यावर दूध फेकण्यात आले. यावेळी शासनाचा निषेध  करण्यात आला. तसेच दुधाला योेग्य दर देण्याची मागणी उपस्थित नेत्यांनी केली. यावेळी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, जमीर शेख, सागर गायकवाड, सोमेश, शोएब मुल्ला, मौला नदाफ, धनराज दुलंगे, प्रकाश कोळी, मुस्ताक शेख, अभि भूमकर, इब्राहीम जमादार, मुश्ताक शेतसंदी, अल्लाबक्ष विजापुरे, जुनेद पिरजादे, सुलेमान शेख, मुजम्मील हुंडेकरी, अतिक शेख यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महामार्गावर दूध फेकून निषेध व्यक्त करताना पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.

 Tags : Solapur, Dairy, milk, control