Thu, Jun 27, 2019 18:39होमपेज › Solapur › पीक विमा कंपनीचा ५३ हजार ७४६ शेतकर्‍यांना ठेंगा

पीक विमा कंपनीचा ५३ हजार ७४६ शेतकर्‍यांना ठेंगा

Published On: Jun 25 2018 1:54AM | Last Updated: Jun 24 2018 8:40PMमंगळवेढा :  प्रा. सचिन इंगळे

मंगळवेढा तालुक्यात 2017 च्या खरीप  हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी पीक विमा न मिळाल्यामुळे 53 हजार 746 शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे.  कंपनीने परतीच्या पावसाच्या आकडेवारीचा समावेश खरीप पिकांत केला. परंतु परतीच्या पावसाचा काहीही उपयोग खरीप पिकांना न झाल्यामुळे शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

राज्य शासनाकडून पीक विमा उतरण्यासाठी ओरियंटल इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी दिली होती. मागील वर्षी खरीप हंगामात मंगळवेढा तालुक्यातील 53,746 शेतकर्‍यांनी खरीप पिकापोटी 1 कोटी 77 लाख रुपये विम्याची रक्कम बँकांत भरली होती. जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्याचा दुसरा क्रमांक होता. उडीद, मूग ,भात, सूर्यफुल, मका, बाजरी, भुईमूग या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हा विमा उतरवण्यात आला होता. 

गेल्यावर्षी  जून ते सप्टेंबर याकालावधीत मरवडे मंडलात 180, आंधळगाव 156, मारापूर 185, हुलजंती 150, भोसे 276 असा पाऊस झाला होता. पावसाचे हे प्रमाण अतिशय अल्प असल्याने  खरिपाची पिके शेतात जळाली होती. मात्र विमा कंपनीने परतीच्या पावसाच्या आकडेवारीचा समावेश खरीप पिकांत केल्याने तालुक्यावर अन्याय झाला आहे. वास्तविक परतीच्या पावसाचा काहीही उपयोग खरीप पिकांना झाला नाही आणि पिके जळून गेली होती.  

तालुक्यातून बाजरी,  मका,  तूर,  उडीद,  मूग, सूर्यफुल,  सोयाबीन, तीळ , भुईमूग  इतर कडधान्ये असे एकूण 36 हजार 8 हेक्टरवर खरीप पीक घेण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांनी केला होता. मात्र ऑगस्टअखेर पावसाने हुलकावणी दिल्याने हातातोंडाला आलेली पिके रानात जळून गेली.  जनावरे, शेळ्या, मेंढ्या सोडून दिले. आर्थिक अडचणींना तोंड देत पन्नास हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता. निसर्गाने अवकृपा दाखवल्याने पीक तर मिळाले नाही; मात्र शासकीय व्यवस्थेने त्याची नुकसान भरपाईदेखील मिळू नये, अशी खबरदारी घेतली.  बार्शी, अक्कलकोट  दक्षिण सोलापूर या तालुक्यांखेरीज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी कमी-अधिक प्रमाणात शेतकर्‍यांनी विम्याची रक्कम भरली होती. मात्र 3 तालुके वगळता विमा कंपनीने इतरांना ठेंगा दाखवला आहे.