Wed, Jul 17, 2019 12:05होमपेज › Solapur › डि फोर कॅनॉलवरील पिकांची बिकट अवस्था

डि फोर कॅनॉलवरील पिकांची बिकट अवस्था

Published On: Apr 15 2018 1:26AM | Last Updated: Apr 15 2018 1:26AMमळोली : वार्ताहर

मळोली (ता.माळशिरस) येथे निरा उजवा कालव्याच्या पाण्यावर आधारीत असलेली ऊस, मका, कडवळ आदी पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मळोली, शेंडेचिंच, तांदुळवाडी, धानोरे या भागातील पिकांची पाहणी करुन शेतीला त्वरीत पाणी सोडले तरच पिके वाचू शकणार आहेत. अन्यथा पिके शेतकर्‍यांच्या हातातून जावू लागली आहेत. टेल टु हेड पाण्याचे आवर्तन असताना या भागातील (डि-4) हा उपफाटा आठवड्याभरानंतर चालू केला. तोंडी 15 ते 20 क्यूसेक्सने पाणी सोडून शेतकर्‍यांना केवळ आशा दाखवली आहे. 

या उपकालव्यावर हजारो एकर ऊस, कडवळ, भुईमुग, मका आदी पिके असून एैन उन्हाळ्यात चुकीच्या नियोजनामुळे हजारो शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. सामान्य शेतकर्‍यास वेठीस धरण्याचा प्रकार या संबंधीत अधिकारी वर्गाकडून होत आहे. पाण्याची पाणी पट्टी भरली नाही तर उतार्‍यावर बोजा चढवू म्हणणारे अधिकारी लाखो रूपयांची शेतकर्‍यांची पिके जळाल्यानंतर मूग गिळून का गप्प बसतात?.

शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार धरून संबंधित अधिकार्‍यांना बडतर्फ करावे अशी मागणी व्यसनमुक्‍ती युवक संघाचे जिल्हाध्यक्ष दिपक जाधव यांनी केली आहे. रीतसरपूर्ण क्षमतेने जर आर्वतन सोडले नाही तर अधिकार्‍यांना फाट्यावरती फिरू देणार नसल्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

Tags : Critical , Crops , De Four Canal,solapur news