Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › बोगस पटसंख्या : 20 शाळांवर फौजदारी!

बोगस पटसंख्या : 20 शाळांवर फौजदारी!

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:45PMसोलापूर : प्रतिनिधी

न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस पटसंख्या दाखवलेल्या शहर व जिल्ह्यातील जवळपास 82 शाळांची  तपासणी होणार असून दोषी आढळल्यानंतर फौजदारी कारवाईची प्रक्रिया शिक्षण खात्याकडून सुरू करण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील 62 शाळांवर मनपा प्रशासनाधिकारी यांच्याकडून, तर उर्वरित 20 ग्रामीण भागातील शाळांवर जि.प. शिक्षणाधिकारी यांच्याकडून ही कारवाईची प्रक्रिया होणार आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक 20 शाळांनी बोगस पटसंख्या दाखविल्याची बाब सन 2011 मध्ये निदर्शनास आली आहे. याप्रकरणी या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना चौकशी करून दोषी शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थापकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

सोलापूर जिल्हाभरात एकूण 115 शाळांत बोगस पटसंख्या दाखविल्याची बाब दिसून आली होती. तपासणी कालावधीत या शाळांत पटसंख्येवरील विद्यार्थ्यांपेक्षा 50 टक्के विद्यार्थी कमी दिसून आले. सात वर्षांनंतर याप्रकरणी कोणतीच कारवाई न झाल्याने न्यायालयात याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिक्षण सचिवांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना या प्रकरणातील शाळांची तपासणी करून या शाळेत बोगस पटसंख्या दाखवून किती शिक्षक नेमण्यात आले, शालेय पोषण आहाराचा लाभ किती विद्यार्थ्यांनी घेतला आदी बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाकडून आलेल्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी राठोड यांनी गटशिक्षणाधिकारी यांची बैठक घेत या सर्व शाळांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. दोषी आढळून आलेल्या शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असेही आदेश दिले आहेत. यामुळे खासगी प्राथमिक शिक्षण संस्थापकांचे धाबे दणाणले आहे.