Tue, Jul 23, 2019 02:10होमपेज › Solapur › टेंभुर्णीत महिला पोलिसासह तीन जणांवर गुन्हा

टेंभुर्णीत महिला पोलिसासह तीन जणांवर गुन्हा

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:30PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

येथील जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळा व संत रोहिदास आश्रमशाळेच्या संस्थापकास पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात महिला पोलिस कॉस्टेबल सह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलिस वर्तुळासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल करण्यास टेंभुर्णी पोलिस टाळाटाळ  करीत असल्याने कैलास सातपुते यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तसेच जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील यांनीही तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय टेंभुर्णी पोलिसांना दिल्याने अखेर टेंभुर्णी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अभय हरिश्‍चंद्र बंडगर, त्याची पत्नी सविता अभय बंडगर दोघे रा.मोहोळ, जि. सोलापूर व टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार रा.टेंभुर्णी,ता.माढा अशी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जय तुळजाभवानी माध्य.आश्रम शाळा व संत रोहिदास आश्रम शाळेचे संस्थापक कैलास भिकाजी सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.

या गंभीर घटनेची अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील ओम बहुद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अभय हरिश्‍चंद्र बंडगर व त्याची पत्नी सविता बंडगर तसेच टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार यांनी टेंभुर्णीतील जय तुळजाभवानी आश्रम शाळा व संत रोहिदास आश्रमशाळा या शाळेत येऊन 30 जानेवारी 2018 रोजी शाळा तपासणी करण्यासाठी टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या सही शिक्क्यासह पत्र दिले होते. प्रत्यक्षात 3 जुलै 2018 रोजी वरील सर्वजण शाळेत आले व शाळेत चौकशी करून त्यांनी तुमच्या विरोधात गंभीर तक्रारी आहेत, याची चौकशी करावयाची आहे असे सांगितले.

तसेच यावेळी शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून नाहक त्रास दिला. नंतर जाताना कैलास सातपुते यांनी काय अर्ज आला आहे, हे दाखवा असे विचारले असता त्यांना भयंकर गंभीर अर्ज आहे, सर्वांसमोर सांगता येणार नाही असे सांगितले. यानंतर 8 जुलै रोजी मोबाईलवर संपर्क करून पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्याच्या आवारातील कँटीनमध्ये अभय बंडगर व महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार यांनी हे प्रकरण गंभीर आहे ते प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. हे ऐकून सातपुते एवढे पैसे द्यायला जमणार नाही म्हणून निघून गेले. त्यानंतर 10 जुलै रोजी त्यांना अभय बंडगर यांनी फोन करून सातपुते यांना माहिती का दिली नाही असे विचारले. यावेळी त्यांच्यात फोनवर बाचाबाची झाली या घटनेची तक्रार देण्यासाठी सातपुते पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी फक्‍त तक्रार अर्ज द्यावयास सांगितले. त्यानंतर चौकशी करून गुन्हा दाखल करतो, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. 

गुन्हा दाखल करीत नसल्याने कैलास सातपुते यांनी 12 जुलै 2018 रोजी पोलिस अधिक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच 3 ऑगस्ट रोजी पंधरा दिवसात गुन्हा दाखल न केल्यास राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या आवारात आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. यानंतर जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिलांचा अभिप्राय आल्यानंतर अखेर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात ओम बहुद्देशीय संस्था मोहोळ या संस्थेचा अध्यक्ष अभय हरिचंद्र बंडगर त्याची पत्नी सविता बंडगर तसेच टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार या तिघांच्या विरोधात  खंडणीचा मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.