टाकळी सिकंदर : वार्ताहर
खंडाळी (ता. मोहोळ) येथील सोनामाई मंदिराजवळ महापुरुषांच्या नावाचा डिजिटल फलक विनापरवाना लावला. तो फलक पोलिस काढून नेताना प्रतिबंध केल्याप्रकरणी खंडाळी येथील आठ ते दहा महिला व पुरुषांवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, खंडाळी येथे विनापरवाना लावलेल्या महापुरुषांचा फलक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घेत रात्री साडेअकरा वाजता पोलिस प्रशासनाने काढून टाकला. हा फलक काढत असताना आठ ते दहा महिला व पुरुषांनी बोर्ड काढू नका असे म्हणून सरकारी वाहनांच्यासमोर आडवे बसून वाहनांस पुढे जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिस नाईक निलेश देशमुख यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, खंडाळी येथील नागरिकांनी आज मोहोळ येथे येऊन पोलिसांनीच समाजाच्या भावना दुखावल्याचे कृत्य केले आहे. जे यात दोषी आहेत त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. याबाबतचे आश्वासन पोलिस अधीक्षक यांनी गुरुवारी दिले होते. मात्र अद्यापही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही. तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा समाजाच्यावतीने कुठल्याही क्षणी रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलिसांना दिला आहे. हे निवेदन सहायक पोलिस निरीक्षक निलेश बडाक यांनी स्वीकारले.