Wed, Jul 24, 2019 08:32होमपेज › Solapur › दोन लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांविरुध्द गुन्हा

दोन लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांविरुध्द गुन्हा

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी

पॅथॉलॉजी लॅबच्या मालकाला 2 लाख रुपये व दरमहा 10 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या तिघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्ताक बाशामियाँ शेख (रा. सिध्देश्‍वर पेठ, काडादी चाळ, सोलापूर) व त्याच्या सोबतचे दोन अनोळखी व्यक्‍ती (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संगमेश्‍वर बंडप्पा काडादी (वय 48, रा. रेल्वेलाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

5 डिसेंबर 2017 रोजी संगमेश्‍वर काडादी हे काळजापूर मारुती मंदिरासमोरील   त्यांच्या नागप्पा काडादी मेमोरियल लॅबोरेटरी, पॅथॉलॉजी लॅबमध्ये असताना सांयकाळी 7 च्या सुमारास मुश्ताक शेख व त्याच्या सोबत दोन अनोळखी लोक आले. त्या तिघांनी काडादी यांना तुम्ही माझ्याविरोधात पोलिसांत व न्यायालयात दाखल केलेला तक्रारी अर्ज काढून घ्या व मला दस्त क्र. 6347/14 ने नोंदवून दिलेले खरेदीखत खरे असल्याचे न्यायालयात नोटरी पत्राने प्रतिज्ञापत्राद्वारे नोंद द्या, तुमच्या तक्रारी अर्जामुळे मला पोलिस खाते व न्यायालयीन खर्च म्हणून बरीच मोठी रक्‍कम खर्च करुन नुकसान सोसावे लागले आहे त्यासाठी 2 लाख रुपये द्या. तुमच्या लॅबमध्ये खोटेनाटे रिपोर्ट देण्याचा उद्योग करुन लोकांकडून भरपूर लुबाडणी करीत आहात, मी व आमचे सहकारी पत्रकार असून मी काडादी चाळ भाडेकरू संघ नामक रजिस्टर  संस्थेचा सेक्रेटरी आहे व एम. आय. पटेल हे अध्यक्ष आहेत. वकिलांच्या 31/7/17 रोजीच्या नोटिसांनी तसेच तुम्हाला कळवून तुमच्याविरुध्द न्यायालयात फिर्याद दिली आहे. ती फिर्याद मी मागे घेतो तुमची फिर्याद काढून घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील.

माझे अनेक पत्रकार साथीदार असून तुमचे व कुटुंबाची बदनामीची लेखमाला सुरु करुन तुमच्या पत्नीचा लॅब व्यवसाय बंद करू. असे न करण्यासाठी आमच्या पत्रकार ग्रुपला 2 लाख रुपये व दरमहा 10 हजार रुपये तुमच्या खोट्या उत्पन्नातून हिस्सा द्या, अशी दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.  त्यामुळे याबाबत संगमेश्‍वर काडादी यांनी पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारी अर्ज दिला होता. सहायक पोलिस निरीक्षक पवळ तपास करीत आहेत. बेकायदा डिजिटल फलक लावणार्‍या 12 जणांविरुध्द गुन्हा नॉर्थकोट प्रशालेचे वॉलकंम्पौड, होम मैदान बाजूस, सात रस्ता, कारागीर पेट्रोल पंपाच्या मागे, काळजापूर मारुती मंदिराजवळील भिंतीवर अनधिकृतपणे डिजिटल फलक लावल्याप्रकरणी 12 फलकधारकांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरातीचे हे डिजिटल फलक आरोग्य निरीक्षक जयकुमार कांबळे व बागेवाडीकर यांनी काढून त्याची माहिती काढून सतीश दगडू शिंदे (वय 54, रा. आशीर्वादनगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उपनिरीक्षक गंपले तपास करीत आहेत.

कोल्हापूरच्या महिलेचे  25 हजारांचे गंठण लंपास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचे 25 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरुन नेले. ही घटना रविवारी सायंकाळी महापौर बंगल्याजवळ घडली. याबाबत जयश्री प्रमोद कांबळे (वय 32, रा. शळा पेठ, फंदे महाराजशेजारी, कोल्हापूर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार लालसंगी तपास करीत आहेत.

Tags : Crime Case,  Demanded, Solapur